Important days in 29th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 एप्रिलचे दिनविशेष.


1848 : चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. 


राजा रवि वर्मा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते. रवि वर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य कलेतील वास्तववादी तंत्र आणि तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या तजेलदार आणि अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता तसेच त्यांची प्रतिभा आणि कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी‘कैसर-इ-हिंद’हे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. 


1867 : भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म.


डॉ. शंकर आबाजी भिसे हे भारतीय अनुप्रयुक्त संशोधक होते. 1893 मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी 'द सायंटिफिक क्लब' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि संस्थेतर्फे त्यांनी 1894 मध्ये विविध कलासंग्रह हे मासिक सुरू केले. त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला. इंग्‍लंड आणि अमेरिका येथील यंत्रतज्ञांनी त्यांना 'हिंदुस्थानचे एडिसन' असे संबोधिले होते


1891 : भारतीदासन, कवी यांचा जन्म. 


1891- भारतीदासन हे 20 व्या शतकातील तमिळ कवी आणि बुद्धिवादी लेखक होते. सुब्रह्मण्य भारतींच्या प्रभावळीतील एक अग्रगण्य तमिळ कवी. त्यांनी तमिळमध्ये काव्य (भावगीते, कथाकाव्ये आणि पद्यनाट्ये), नाटक, कादंबरी, पटकथा इ. प्रकारांत लेखन केले.


1979 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि लेखक राजा महेंद्र प्रताप यांचे निधन.


राजा महेंद्र प्रताप सिंग हे स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, क्रांतिकारक, समाजसुधारक आणि भारताचे महान दानशूर होते. ते 'आर्यन पेशवा' या नावाने प्रसिद्ध होते आणि भारताच्या हंगामी सरकारचे अध्यक्ष होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात 1940 मध्ये जपानमध्ये 'भारतीय कार्यकारी मंडळ' स्थापन केले. 1911 च्या बाल्कन युद्धातही त्यांनी आपल्या महाविद्यालयीन मित्रांसह भाग घेतला होता. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे.


2020 : सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे कर्करोगाने निधन. 


प्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे आहे. त्यांनी जय हनुमान (1998) या मालिकेत वाल्मिकी ऋषींची भूमिका केली. स्लमडॉग मिलेनिअर (2008) या ऑस्कर आणि इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली. अंग्रेजी मिडीयम (2020) हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने 2011 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मनित केले.  


आंतरराष्ट्रीय नृत्य दिन 


आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस हा 29 एप्रिल रोजी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, नृत्य कलेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जाणारा नृत्याचा जागतिक उत्सव आहे. आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था (आयटीआय) ही संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेची (युनेस्को) भागीदार असलेली स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने 1982 पासून 29 एप्रिल हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले.


महत्वाच्या बातम्या :