Annu Kapoor Birthday : आयुष्यातील सर्व अडचणींमध्येही जी व्यक्ती आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवते, हरत नाही, तीच व्यक्ती नेहमी यशस्वी होते. अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) याचे उत्तम उदाहरण आहेत. 20 फेब्रुवारी 1965 रोजी भोपाळमध्ये जन्मलेले अन्नू कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता गायक, रेडिओ जॉकी, टीव्ही होस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात भरपूर काम केले आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अन्नू कपूर यांना 'अंताक्षरी'ने ओळख मिळवून दिली होती.


अन्नू कपूर यांचे वडील मदनलाल कपूर पारशी थिएटर कंपनी चालवत होते. तर, त्यांची आई कमल शबनम कपूर या शिक्षिका होत्या. अन्नू यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. अन्नू यांचे खरे नाव अनिल कपूर होते. अभिनेता अनिल कपूरच्या प्रसिद्धीमुळेच त्यांनी आपले नाव बदलून अन्नू कपूर ठेवल्याचे बोलले जाते. अन्नू कपूर यांचे बालपण खूप खडतर होते. आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी अन्नू चहा आणि लॉटरीची तिकिटे विकायचे.


यानंतर अन्नू कपूर यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच अभिनय कौशल्य शिकले. अन्नू कपूर जेव्हा एनएसडीमध्ये होते, तेव्हा त्यांनी एका नाटकात इतके अप्रतिम काम केले की, प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. या नाटकात 23 वर्षीय अन्नूने 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल त्यांच्या अभिनय कौशल्याने इतके प्रभावित झाले की, त्यांना 'मंडी' चित्रपटात काम दिले. या चित्रपटानंतर अन्नू कपूर यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. अन्नू यांनी अशा अनेक चित्रपटात काम केले, पण 'अंताक्षरी' होस्ट करून ते प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचले.


संगीताचे उत्तम ज्ञान असलेले अन्नू कपूर एक उत्तम गायकही आहेत. याशिवाय त्यांची हिंदी भाषेवर असलेली पकडही अप्रतिम आहे. अन्नू बोलतात, तेव्हा ऐकणारे थक्क होतात. अत्यंत उत्साही अन्नू यांनी टीव्हीवर 'अंताक्षरी' होस्ट करायला सुरुवात केली होती.


अन्नू कपूर यांनी 2012 मध्ये आलेल्या 'विकी डोनर' चित्रपटात ‘बलदेव चढ्ढा’ यांची भूमिका साकारून प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. चित्रपटापासून टीव्हीपर्यंतच्या जगात आपल्या कामाची अमिट छाप सोडणाऱ्या अन्नू कपूर यांचे  बालपण कठीण गेले असेल, पण आज त्यांचे मुंबईत स्वतःचे घर आहे, ताफ्यात आलिशान वाहने उभी आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha