मुंबई : आज बॉलिवूडचा मोस्ट अॅक्टिव्ह अभिनेता अक्षयकुमारचा वाढदिवस. बॉलिवूडमधील सगळ्यात बिझी कलाकार म्हणून अक्षय कुमारचा उल्लेख होतो. गेली 29 वर्षे अक्षयकुमार बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमची चर्चा सुरु आहे. मात्र बॉलिवूडमधील कोणत्याही घराण्यातून आलेला नसताना, प्रचंड मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर अक्षयकुमारनं या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.


अक्षयनं बॉलिवूडमध्ये दबदबा तर निर्माण केला आहेच मात्र सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून देखील त्याची वेगळी ओळख आहे. कोणत्या कलाकाराची किती मिळकत आहे, त्यावर फोर्ब्ज कंपनी दरवर्षी सर्वे घेत असते. या वर्षीही त्यांनी तो घेतला. यंदा या मिळकतीत फरक पडेल असं अनेकांना वाटलं. कारण 2020 चं निम्म वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे काम नाही. त्यामुळे मानधनही नाही. पण फोर्ब्जने जारी केलेले आकडे पाहाल तर थक्क व्हाल. त्यांच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. तर जगात त्याचा नंबर आहे सहावा. तर पहिल्या नंबरवर द रॉक आहे.


फोर्ब्जने 1 जून 2019 ते 1 जून 2020 या काळातली कलाकारांच्या मानधनाचं सर्वेक्षण केलं आहे. त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. यात आलेल्या निष्कर्षानुसार (आकडे -मिलियन डॉलर्समध्ये) डिवाईन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सॅंडलिअर (41) जॅकी चेन (40).


अक्षयकुमार हा या यादीत पहिल्या दहात असलेला एकमेव अभिनेता आहे. त्यामुळे भारतातलाही तो सध्या सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे यात शंका नाही. त्याचं उत्पन्न होतं, ३ अब्ज 63 कोटी 3 लाख 46 हजार. अक्षयकुमारने यापूर्वी अनेक चित्रपटांतून आपलं मनोरंजन केलं आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो टॉयलेट एक प्रेमकथा, बेबी, पॅडमॅन, 2.0, स्पेशल 26आदी अनेक चित्रपटांचा समावेश होतो. अक्षयकुमार अनेक जाहिरातींमध्येही दिसतो. तो करत असलेले करार, जाहिराती, सिनेमे यासगळ्यातून आलेली रक्कम इथे मोजली जाते.