मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. लॉकडाऊन काळात जसं मालिकांचं शूट सुरू झालं तसं कलाकारांना कोरोना होण्याची धास्ती वाढू लागली. पण तरीही पुरेशी काळजी घेऊन हे शूट चालू होतं. आता मात्र ज्याची भीती होती तीच गोष्ट समोर आ वासून उभी ठाकली आहे. अनेक मराठी सेट्सवर कोरोना आला आहे. सिंगिंग स्टार्सचं उदाहरण ताजं आहेच. आता स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेच्या सेटवरही कोरोना झाला आहे. जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता पवारला कोरोनानं गाठलं. ती सुखरुप आहेच. पण तिला 14 दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. म्हणूनच मालिकेने लीप घ्यायचं ठरवलं आणि तिची भूमिका भार्गवी चिरमुलेला मिळाली.


गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका टीव्हीवर दाखल झाली. आजपर्यंत पडद्यावर आलेल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित अनेक मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये जिजाऊंच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहेच. स्वराज्याचा इतिहास मांडताना तो जिजाऊंच्या कार्याविषयी सांगितल्याशिवाय पूर्णच होणारा नाही. पण संपूर्णपणे जिजाऊंचा जीवनप्रवास दाखवणारी एकही मालिका तयार झाली नव्हती. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून या मालिकेची निर्मिती करण्यात आली.


सुरूवातीच्या एपिसोडमध्ये छोट्या जिजाऊंची भूमिका निष्ठा वैद्य या बालकलाकाराने साकारली. जिजाऊंच्या मोठेपणाच्या भूमिकेसाठी जेव्हा अभिनेत्रींची निवड करण्याचे काम सुरू झाले तेव्हा या मालिकेत अमृता पवारची वर्णी लागली. मालिकेत अमृताच्या एन्ट्रीने पहिलं लीप आलं. अर्थात जिजाऊंच्या आयुष्यपटाची मांडणी करत असताना दुसरं लीपही नियोजित होते ज्यामध्ये जिजाऊंचे वार्धक्य दाखवण्यात येणार होते. त्यावेळी वृद्ध जिजाऊंच्या भूमिकेसाठी अभिनेत्री बदलण्याचाही निर्मात्यांचा विचार होता, मात्र या लीपला नक्कीच खूप वेळ होता. अमृताला कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेने जिजाऊंचा पडद्यावरचा चेहरा मालिका सुरू झाल्यानंतर वर्षभरात तिसऱ्यांदा बदलण्याची वेळ आली आहे.


कोरोनामुळे हातातलं काम सोडावं लागण्याचा अनुभव गेल्या तीन साडेतीन महिन्यात अनेक कलाकारांना आला आहे. कोरानाचे निदान झाल्यानंतर 14 ते 28 दिवस क्वारंटाइन व्हावे लागत असल्याने इतके दिवस मालिकेच्या चित्रीकरणातून सुट्टी मिळणे अवघड असते. शिवाय कथेत अचानक बदलही करता येत नाहीत. अशावेळी ते पात्र साकारणारा कलाकारच बदलण्याला पर्याय नसतो. प्रेम पॉयझन पंगा या मालिकेत नायिकेच्या वडीलांची भूमिका करणाऱ्या स्वप्नील राजशेखर यांच्या इमारतीत कोरोना रूग्ण सापडल्याने अख्खी बिल्डींग सील केली. स्वप्नीलला शूटिंगसाठी हजर राहायचे होते, पण क्वारंटाइनकाळात त्याला कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नसल्याने त्याने ही भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला. असाच प्रसंग अमृता पवार हिच्यावर कोरोनामुळे आला आहे.