Hanuman Ansh Box Office Collection: 'हनुमान अंश'ची कोटीच्या कोटी उड्डाणे! 'महावतार नरसिंहा’चा विक्रम मोडत रचला भक्तीपटांचा नवा इतिहास, आतापर्यंत किती कमावले?
‘महावतार नरसिंहा’ला 2024 मध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र ‘हनुमान अंश’च्या तुलनेने कमी बजेट आणि आतापर्यंतच्या कमाईचा विचार करता, हा चित्रपट सर्वाधिक प्रॉफिटेबल भक्तीपट ठरल्याचं म्हटलं जात आहे.

Hanuman Ansh: नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh) या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने 44व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली असून, त्यासोबतच ‘हनुमान अंश’ने 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महावतार नरसिंहा’चा कमाईचा रेकॉर्ड मोडल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा चित्रपट सर्वाधिक नफा कमावणारा भक्तीपट ठरल्याचं म्हटलं जात आहे.
हनुमान अंश बॉक्स ऑफिस कलेक्शन (Hanuman Ansh)
Sacnilkच्या माहितीनुसार, ‘हनुमान अंश’ने 44व्या दिवशी म्हणजेच शनिवारी 7,119 शोमधून 9.75 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर भारतातील चित्रपटाचं नेट कलेक्शन 258.13 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर ग्रॉस कलेक्शन 304.80 कोटी रुपये झालं आहे. चित्रपटाने जगभरातही चांगली कमाई केली आहे. 44व्या दिवशी ओव्हरसीजमध्ये 1.50 कोटी रुपयांची कमाई झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर चित्रपटाची परदेशातील कमाई 24.50 कोटी रुपये झाली असून, ‘हनुमान अंश’ची वर्ल्डवाइड कमाई 329.30 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘महावतार नरसिंहा’चा विक्रम मोडला?
Koimoiच्या माहितीनुसार, ‘हनुमान अंश’ने ‘महावतार नरसिंहा’चा नफ्याचा विक्रम मागे टाकला आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या ॲनिमेटेड एपिक ॲक्शन भक्तीपटाचं बजेट सुमारे 20 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने 247.96 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं होतं. त्याची लाइफटाइम कमाई 300 ते 325 कोटी रुपयांच्या आसपास राहिली होती. मात्र ‘हनुमान अंश’ने 44व्या दिवशीच हा आकडा पार केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 329.30 कोटी रुपयांची वर्ल्डवाइड कमाई केल्याचा दावा आहे.
सर्वाधिक नफा कमावणारा भक्तीपट?
‘महावतार नरसिंहा’ला 2024 मध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र ‘हनुमान अंश’च्या तुलनेने कमी बजेट आणि आतापर्यंतच्या कमाईचा विचार करता, हा चित्रपट सर्वाधिक प्रॉफिटेबल भक्तीपट ठरल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच ‘हनुमान अंश’ हा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.44 दिवसांनंतरही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम असल्याने आगामी दिवसांत त्याच्या कमाईचा आकडा आणखी वाढतो का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.






















