‘बिग बॉस जिंकला पण निर्मात्यांनी अजून दिली नाही कार; गौरव खन्नाच्या कमेंटमुळे चर्चा रंगल्या, प्रणित मोरेची मजेशीर कमेंट
गौरवने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला असून, त्यावर तो चाहत्यांसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतो.

Gaurav khanna: ‘बिग बॉस 19’चा विजेता ठरलेला अभिनेता गौरव खन्ना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गौरवने स्वतःच खुलासा केला आहे की, बिग बॉस शो जिंकूनही त्याला मिळणारी कार अजूनपर्यंत त्याच्या ताब्यात आलेली नाही.
‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला गौरव खन्ना आज टेलिव्हिजनवरील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो. डेली सोप्ससोबतच त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकल्यानंतर त्याने सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफीही आपल्या नावावर केली. यानंतर गौरवने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला असून, त्यावर तो चाहत्यांसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतो.
अंबानी कुटुंबासाठी खास कार्यक्रमाचं होस्टिंग
गौरवने नुकताच आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीची झलक दाखवली आहे. हा कार्यक्रम रिलायन्स कुटुंबाकडून दरवर्षी धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचं होस्टिंग यंदा गौरव करणार आहे.
व्हिडिओमध्ये गौरव सांगतो की, हा त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. मोठी स्क्रिप्ट, घोड्यावरून स्टेजवर एंट्री आणि दोन शो प्रत्येक शोमध्ये तब्बल 40 हजार प्रेक्षकांची उपस्थिती असणार असल्याचं त्याने सांगितलं. हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होणार नसला, तरी वैयक्तिक पातळीवर ही संधी त्याच्यासाठी मोठी संधी असल्याचं गौरवने नमूद केलं.
‘बिग बॉस’मध्ये जिंकलेली कार अजूनही मिळालेली नाही
या व्हिडिओमध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याचीही एंट्री होते. दोघं एकत्र जेवण करताना ‘बिग बॉस 19’मधील आठवणींना उजाळा देतात. जेवताना प्रणित काटा-चमचा वापरत असल्याचं पाहून गौरव त्याची खिल्ली उडवतो. त्यावर प्रणित मजेशीर उत्तर देत म्हणतो की, “मी आता श्रीमंत झालोय!” व्हिडिओच्या शेवटी, गौरव प्रणितला मिठाई देतो. त्याचवेळी प्रणित गंमतीने गौरवला म्हणतो की, “मग मला तुझी बिग बॉस मधील कार गिफ्ट कर.” यावर हसत गौरव उत्तर देतो, “ती कार मला अजून मिळालेलीच नाही.”गौरवच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘बिग बॉस’मधील बक्षिसांबाबत चर्चा सुरू झाली असून, चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.























