Drishyam 3 Sameer Deshmukh: 'दृश्यम'मधील सॅम, पहिल्या पार्टमध्ये फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम, नंतर एक सेकंदही दिसला नाही, तरी सेंटर ऑफ स्टोरी राहिलेला समीर देशमुख आता करतोय काय?
Drishyam 3 Sameer Deshmukh: अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमात 'सॅम'ची भूमिका साकारणारा ऋषभ चड्ढा तुम्हाला आठवतो का? सिनेमातील त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण कथेला कलाटणी मिळाली होती. 11 वर्षांनंतर तो कुठे आहे आणि काय करत आहे, हे जाणून घ्या.

Drishyam 3 Sameer Deshmukh: अजय देवगणचा 'दृश्यम 3' (Drishyam 3) सध्या बॉक्स ऑफिसवर (Drishyam 3 Box Office Collection) धुवांधार कमाई करतोय. गाजलेल्या 'दृश्यम' (Drishyam) फ्रेंजायझीचा हा तिसरा भाग. पण, आजही पहिला पार्ट प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 2015 मध्ये रिलीज झालेला आणि अजय देवगण (Ajay Devgan), तब्बू (Tabbu) यांची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम' सिनेमा केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही खोलवर ठसा उमटवून गेला. या सिनेमाची संपूर्ण कथा समीर देशमुख (सॅम) नावाच्या एका मुलाच्या मृत्यूभोवती फिरते. सॅमच्या मृत्यूनंतर, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी विजय साळगावकर 2 ऑक्टोबरची कथा रचतो, जी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होते. बरं पोलीसच नाहीतर, सॅमचे आई-वडीलही पूरते गोंधळून जातात. मृत सॅम हा गोव्याच्या आयजी मिरा देशमुख यांचा मुलगा असतो. आई एवढी मोठी पोलीस अधिकारी असूनही आपल्या मुलाच्या मृत्यूचं गूढ तिला उलगडताच येत नाही. विजय साळगावकरच्या 2 ऑक्टोबरच्या गोष्टीपुढे अख्खी पोलीस फौज हात टेकते. 'दृश्यम 3'मध्ये ही कथा शेवटापर्यंत आलीय, 'दृश्यम: द कन्क्लुजन' (Drishyam: The Conclusion) हा या कथेचा शेवट असेल. पण, तरी 'दृश्यम'मध्ये अवघ्या काही मिनिटांसाठी दिसलेल्या सॅमला प्रेक्षक मात्र विसरलेले नाहीत.
'दृश्यम' सिनेमाच्या संपूर्ण कथानकात, आयजी मीरा देशमुखला एकच प्रश्न सतावतो. जर तिचा मुलगा सॅम याचा खरोखरंच मृत्यू झालाय, तर त्याचा मृतदेह कुठे आहे? प्रेक्षकांना याचं उत्तर माहीत असलं, तरी सॅमच्या पालकांना मात्र त्याबद्दल काहीच कल्पना नसते.
सॅमची भूमिका साकारणाऱ्या ऋषभ चड्ढानं यात एका श्रीमंत आणि बिघडलेल्या तरुणाचं पात्र रंगवलंय. कॉलेजच्या सहलीदरम्यान, तो मुलींशी गैरवर्तन करतो आणि विजय साळगावकरची मोठी मुलगी 'अंजू' हिच्यावर वाईट नजर ठेवतो. तो गुपचूप अंजूचा बाथरूममधील व्हिडीओ रेकॉर्ड करतो आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देतो. नंतर तो अंजूला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो आणि थेट साळगावकरांच्या घरापर्यंत पोहोचतो. तिथे येऊन तो अंजूला धमकावतो, नंतर तिथे तिची आई येते, तिच्यासोबतही तो गैरवर्तन करतो. त्यानंतर झालेल्या झटापटीत अखेर सॅमचा मृत्यू होतो. विजयला या घटनेबद्दल समजताच, तो आपल्या कुटुंबाला अटकेपासून वाचवण्यासाठी एक प्लान रचतो.

अशा प्रकारे 'दृश्यम'चा खेळ सुरू होतो, ज्यामध्ये पोलिसांना सॅमचा मृतदेहही सापडत नाही. सॅमचे आई-वडील खूप मोठ्या हुद्द्यावर असतात, त्या तुलनेत विजय साळगावकरचं कुटुंब अत्यंत सामान्य असतं. सॅम गोव्याच्या आयजीचा मुलगा, त्यामुळे गोवा पोलीस विजयच्या कुटुंबाला कोंडीत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, विजय घटनांची अशी काही मांडणी करतो आणि पुरावे अशा प्रकारे पेरतो की, तपास यंत्रणा वारंवार चुकीच्या दिशेनं भरकटत जातात.
'दृश्यम'मधील सॅम आहे तरी कोण? (Who Is Rishabh Chadha?)
'दृश्यम'मुळे घराघरांत पोहोचलेल्या ऋषभ चड्ढाची अभिनय कारकीर्द बरीच जुनी आहे. 1994 मध्ये मुंबईत जन्मलेल्या ऋषभनं 'सॅम'ची भूमिका साकारण्यापूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलेलं. 2007 मध्ये त्यानं आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि सिनेमे तसेच टेलिव्हिजन, वेब सीरिजमध्ये काम केलं. 'दृश्यम'पूर्वी तो सोनम कपूर आणि फवाद खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'खूबसूरत' (2014) या सिनेमात झळकलेला. त्यानंतर, 2018 मध्ये त्यानं 'लुप्त' (Lupt) या सिनेमात काम केलं. टेलिव्हिजनच्या जगात, तो 'बेस्ट ऑफ लक निक्की', 'द सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर' आणि 'आदत से मजबूर' यांसारख्या शोचा भाग राहिला आहे. तसेच, 'डिव्होर्स के लिये कुछ भी करेगा' या वेब सीरिजमध्येही त्यानं मुख्य भूमिका साकारलीय.
View this post on Instagram
दोन वर्षांपासून सिनेमांपासून दूर, ऋषभ आता करतोय तरी काय?
'दृश्यम' (Drishyam) सिनेमात ऋषभ चढ्ढानं साकारलेली 'सॅम'ची भूमिका जरी पडद्यावर अल्पकाळासाठीच दिसली असली, तरी त्या भूमिकेमुळे त्याला एक अशी कायमस्वरूपी ओळख मिळाली जी आजही त्याच्याशी जोडलेली आहे. तरीही, गेल्या जवळपास दोन वर्षांत त्यानं अभिनयाचा कोणताही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. आता पडद्यावर दिसण्याऐवजी, ऋषभ प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करतो. तो 'मॉडर्न मजनू' (Modern Majnu) या बॅनरखाली कथाकथन आणि काव्यवाचनाचे कार्यक्रम आयोजित करतो आणि त्यात लोकांसाठी कथा, कवितांचं सादरीकरण करतो. हे लाईव्ह कार्यक्रम विविध तारखांना आयोजित केले जातात आणि प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून त्यांची तिकिटं बुक करू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















