Pinjara Marathi Movie : भारतीय मनोरंजनविश्वात मराठी चित्रपटांचं विशेष योगदान आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्ण इतिहास आजही प्रेक्षकांना त्या सोनेरी काळात घेऊन जातो. याच प्रवासात मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’ (Pinjara). 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आज 50 वर्ष पूर्ण केली आहेत. आजही जेव्हा मराठी चित्रपटांचा विषय निघतो, तेव्हा ‘पिंजरा’चं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनेत्री संध्या (Sandhya), अभिनेते डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo), निळू फुले (Nilu Phule) यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही रसिक प्रेक्षक मन लावून पाहतात.


‘पिंजरा’ चित्रपट खास असण्याचं आणखी एक करण म्हणजे हा डॉ. श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे. या चित्रपटात एक मराठी शिक्षक, एका तमाशात काम करणाऱ्या महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो. परंतु, तारुण्याने रसरसलेली ही नृत्यांगना उलट त्या शिक्षकालाच तमाशाचा नाद लावते. हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील पहिला रंगीत तमाशाप्रधान चित्रपट होता. अनैतिकतेच्या पिंजऱ्यात भले-भले जरी अडकले, तर तिथून अधःपतनाशिवाय मागे फिरण्याचा दुसरा रस्ता नाही, ही शिकवण या चित्रपटाने दिली.


जगण्याची शिकवण देणारा चित्रपट!


‘पिंजरा’ या चित्रपटामध्ये अभिनेते डॉ. श्रीराम लागू हे तमाशात काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडलेले दाखवले आहेत. संपूर्ण चित्रपटात त्यांची स्वतःबद्दलची आदराची भावना, आत्मसन्मान आणि तमाशामधील लोकांचे जीवन यांच्या तफावत दाखवली आहे. पेशाने शिक्षक असणाऱ्या त्यांना आपला समाजातील दर्जा वरचा आहे, असे वाटते. मात्र, तमाशाच्या फडात वारंवार त्यांना दुय्यम वागणूक मिळते. तमाशातील स्त्रीच्या प्रेमापोटी ते हे सगळं सहन करतात. कालांतराने ते त्यांच्यातील एक बनून जातात.


इथे गावातील लोक अजूनही त्यांना महान शिक्षक समजत असतात, त्यांचा आदर करत असतात. बरच दिवस गायब असणाऱ्या मास्तराचा खून झाला, असे समजून ते त्यांचा पुतळा उभारतात. गावकऱ्यांचे प्रेम पाहून शेवटी नायकालाच अपराधी वाटते. मास्तरांचा खून मीच केला आहे, असे नायक गावात सांगतो. गावकऱ्यांच्या मनातल्या आपल्या प्रतिमेला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आपल्या आदर्श शिक्षकाची हत्या केली म्हणून गावकरी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतात. अशा तऱ्हेने मास्तर तुरुंगात जाऊन प्रायश्चित्त घेतात. आपल्या कर्माची उपरती झालेली ती नायिका जगासमोर खरं बोलणार, तोच तिची वाचा जाते अन् ती मुकी होते. अखेर मास्तर निरपराध असल्याचे सिद्ध होतच नाही आणि दोघांचेही आयुष्य उध्वस्त होते.


गाण्यांमुळेही गाजला चित्रपट!


‘आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी’, ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली..’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘दिसला ग बाई दिसला’, ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’, ‘मला इश्काची इंगळी डसली’, ‘मला लागली कुणाची उचकी’ ही जगदीश खेबुडकरांच्या लेखणीतून साकारलेली गीत आणि संगीतकार राम कदम यांचे बहारदार संगीत यानेही चित्रपटाला चार चांद लावले. व्ही. शांताराम यांच्या हा ‘माईल स्टोन’ चित्रपटाला लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी यांचा आवाज लाभला होता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha