Anupam Kher : काश्मिरी पंडितांचे निर्गमन आणि हत्यांवरील, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या प्रसिद्ध चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) म्हणतात की, ज्यांना वाटते की, या चित्रपटात अपूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे, ते स्वत:चे सत्य मांडू शकतात. अशा लोकांनी स्वत:चा चित्रपट बनवून लोकांना सत्य काय ते दाखवावे. त्यांनी चित्रपटाची निंदा करणाऱ्यांना 'खिसियानी बिल्ली खंभा नोचे'  असे म्हटले आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनाची शोकांतिका गेल्या 32 वर्षांपासून लोकांपासून लपवून ठेवण्यात आली होती, असेही ते यावेळी म्हणाले.


'द कश्मीर फाइल्स'मध्ये अपूर्ण सत्य दाखवले आणि इतिहासाचा विपर्यास केळा का? एबीपी न्यूजच्या या प्रश्नावर उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले, ‘असे म्हणणाऱ्यांसाठी माझा हा सल्ला आहे की, त्यांनी त्यांचे सत्य दाखवावे, त्यांचा स्वतःच चित्रपट बनवावा. काश्मीरवर चार-पाच चित्रपट बनले आहेत, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, पण त्यापैकी कोणीही काश्मीर पंडितांच्या वेदना दाखवल्या नाहीत, त्यांची कहाणी दाखवली नाही.. तेव्हा, कोणीही म्हटले नाही की, तुम्ही दहशतवाद्यांना ग्लॅमरस करून चित्रपट बनवत आहात... 5 लाख काश्मिरी हिंदूंना तिथून हाकलून दिले गेले. आता सत्य दाखवणाऱ्या सिनेमावर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे... आता सत्य समोर आले आहे.’


अनुपम खेर या चित्रपटाबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांना पुढे म्हणाले, 'खिसियानी बिल्ली खंभा नोचे  हे म्हणजे असे की, ज्या वस्तीत आपण राहायचो, तिथे एखादा मुलगा अभ्यासात पहिला यायचा, तेव्हा आपण म्हणायचो हा मुलगा खूप वाचतो, म्हणूनच तो पहिला येतो. पण, तो इतर गोष्टींमध्ये तो चांगला नाही. हे असं होतच राहतं, आपण पुढे जायचं.’


चित्रपटाने प्रेक्षकांशी कनेक्शन निर्माण केलं!


200 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या अत्यंत कमी बजेटच्या 'द कश्मीर फाइल्स' संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले, ‘हा चित्रपट इतका चांगला व्यवसाय करेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटाची कोणतीही प्रसिद्धी झाली नाही, आम्ही कोणत्याही टीव्ही शोला गेलो नाही.. हळूहळू प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊ लागले.. या चित्रपटाने प्रेक्षकांना सिनेमागृहात पोहोचवले.. कोरोना आणि लॉकडाऊननंतर, हा एक असा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. या चित्रपटात गाणी नाहीत, अप्रतिम लोकेशन्स नाहीत, कॉमेडी ट्रॅक नाहीत, रोमान्स नाही. हा चित्रपट लोकांच्या अश्रू आणि दु:खावर आधारित आहे. पण त्याने प्रेक्षकांशी जे कनेक्शन निर्माण केले आहे, ते अविश्वसनीय आहे.’


एका घटनेचा संदर्भ देत अनुपम खेर पुढे म्हणाले, ‘आज सकाळी मी घरातून बाहेर पडलो, तेव्हा एक व्यक्ती गाडीतून खाली उतरला आणि मला म्हणाला की, मला तुला मिठी मारायची आहे आणि मग त्याने मला मिठी मारली आणि ते इतके रडले की, माझे डोळे पाणावले. मन भरून आले. कुठेतरी हा चित्रपट लोकांना जोडतो आहे. मला नेहमीच वाटत आले आहे की वेदना लोकांना एकेमेकांशी जोडते.’


सलमान खानने केलं कौतुक!


अलीकडेच अभिनेता सलमान खान यानेही अनुपम खेर यांना फोन करून 'द कश्मीर फाइल्स'च्या यशाबद्दल अभिनंदन केले, ज्याचा उल्लेख अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. याबाबत अनुपम खेर म्हणाले की, ‘सलमानने मला फोन केला. ही वेगळी गोष्ट आहे की, अनेकांनी फोनही केला नाही... ज्यांनी केले नाही, मी यावेळी त्यांचे नाव घेणार नाही... जेव्हा सलमान खानने मला फोन केला, तेव्हा छान वाटले.’


सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अनुपम खेर पुढे म्हणाले की, ‘सलमानने त्यांना फोन कॉल दरम्यान सांगितले की, तो एनडी स्टुडिओमध्ये अनेक दिवस शूटिंग करत आहे आणि तेथे कोणतेही चांगले नेटवर्क नव्हते, त्यामुळे त्याला कॉल करायला उशीर झाला. सलमानने फोन केल्यावर मला खूप आनंद झाला. मला वाटतं चित्रपटाचं यश सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. एखाद्याला लहान वाटू नये, कारण ते सिनेमाचं यश आहे. हे थिएटरचं यश आहे, ते प्रेक्षकांचं आहे. हे यश आहे आणि सिनेमा व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीचे हे यश आहे.’


हे यश ‘त्या’ सर्वांचे!


'द कश्मीर फाइल्स'च्या यशाबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्सचे यश हे प्रत्येक लहान शहरातून आलेल्या आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांचे यश आहे. मी वन विभागात काम करणाऱ्या एका छोट्या कारकुनाचा मुलगा आहे. माझ्या चित्रपटाने 250 कोटींचा व्यवसाय केला असेल, तर याचा अर्थ असा आहे की, स्वप्न पाहणे कधीच थांबवू नका. चित्रपटाचे यश त्या सर्व लोकांचे आहे, जे मुंबईत अभिनेता बनण्यासाठी, व्यावसायिक बनण्यासाठी, पत्रकार काहीही बनण्यासाठी येतात. अशावेळी कठोर परिश्रम करणे आणि प्रामाणिक असणे खूप महत्त्वाचे आहे.’


अभिनेता बोमन इराणी यांनी आयोजित केलेल्या 'स्पायरल बाउंड' या कार्यक्रमाला अनुपम खेर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्क्रिप्ट रायटिंग क्लासेसशी संबंधित असलेल्या 'स्पायरल बाउंड'ने बुधवारी आपल्या स्थापनेची दोन वर्षे पूर्ण केली.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha