मुंबई : नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रात्री 10.15 च्या सुमारास त्याचे निधन झाले. श्रवण राठोड यांचा मुलगा संजीव राठोड यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले, "काही वेळापूर्वीच बाबा आम्हाला सोडून गेले आहे. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले आहे". 


गेल्या तीन दिवसांपासून श्रवण राठोड यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या दोन किडनी देखील व्यवस्थित काम करत नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी सोमवारी डायलिसिस सुरू केले होते.  शनिवारी त्यांना मुंबईतील माहिमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रवण राठोड यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, श्रवण यांना किडनीचा त्रास वाढत असल्याने डॉक्टरांनी डायलिसिस करण्याचा निर्णय घेतला होता. 


श्रवण राठोड यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा संजीव राठोड यांनी वडिलांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, माझ्या वडिलांनी सध्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर 66 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह श्रवण राठोड यांची तब्येत नाजूक होती. त्यानंतर काही वेळानंतर तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.