मुंबई : आपले वडील समजून एका अनोळखीच व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोविड रुग्णांचा रुग्णवाहिकेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सदर इसमाच्या कुटुंबाने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली असून चौकशीची मागणी केली आहे.


मुंबईच्या चेंबूर परिसरात रामसरण गुप्ता हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. 24 जून 2020 मध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच दरम्यान त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांना 24 जून रोजी बांद्रा येथील भाभा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 29 जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचा कुटुंबियांना कळवण्यात आले. 


BKC Covid Center : बिकेसी जम्बो कोविड केंद्राचा घोळ, मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला, चार दिवस महिलेचा शोध


त्यानंतर वांद्रा स्मशानभूमीत रामसरन यांच्यावर कुटूंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तीन दिवसांपूर्वी एका रुग्णांचा रॅप केलेला रुग्णवाहिकेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मृत रामसरण गुप्ता यांच्या कुटुंबियांनी देखील पहिला,त्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.व्हिडीओमध्ये दिसणारे हे आपले वडील असल्याचा दावा त्यांची मुली निर्मला व शर्मिला गुप्ता यांनी केला आहे. शिवाय घरातील इतर सदस्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना देखील मानसिक धक्का बसला.


त्यामुळे आपण वडील समजून कोणावर अंत्यसंस्कार केले? असा प्रश्न रामसरण यांच्या कुटूंबियांना पडला आहे. भाभा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दिला आहे. ज्यावेळी माझ्या वडिलांच्या मृतदेह गुंडाळलेल्या अवस्थेत होता, त्याच वेळी हे माझे वडील नसल्याची खात्री झाली होती. मात्र त्यांचा चेहरा दाखवला नसल्याने आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र या व्हायरल व्हिडिओ नंतर आमची खात्री झाली आहे की आम्हाला दुसऱ्याच कोणाचे शव देण्यात आले आणि आम्ही त्यावर अंत्यसंस्कार केले.आता माझे वडील कुठे आहेत? असा सवाल त्यांची मुलगी करत असून आम्हाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.