मुंबई : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि अनेकांच्या प्रेरणास्थानी, श्रद्धास्थानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा आजवर अनेक माध्यमांतून आणि अनेक रुपांतून प्रेक्षकांच्या आणि समस्त देशवासियांच्या भेटीला आली आहे. महाराजांच्या नावतच मुळात सारंकाही दडलं आहे, अशीच भावना उराशी बाळगणाऱ्या एशाच एका अवलियानं अतिशय समर्पकतेनं आणि तितक्याच आत्मियतेनं महाराजांचं चरित्र थेट आपल्या राष्ट्रभाषेतून म्हणजेच हिंदी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. कवी आणि प्राध्यापक म्हणून आपली ओळख बनवू पाहणाऱ्या आदित्य दवणे याच्या प्रयत्नांतून महाराज आता विविधभाषी जनतेपर्यंत पोहोचत आहेत.


हिंदी भाषेत, ऑडिओ पॉडकास्ट स्वरुपात थेट शिवचरित्र साकारण्याबाबत सांगताना आदित्य म्हणतो, जुलै-ऑगस्ट महिन्यादरम्या स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला व्हिडीओ बराच व्हायरल झाला, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि अगदी खळखटॅकपर्यंत हे प्रकरण गेले. या घटनेने मला अस्वस्थ होताना मनात विचार आला- 'आज मुंबई आणि अगदी भारतभर शिवाजी महाराजांचे शेकडो पुतळे आहेत, ते अनेक अमराठी बांधव बघत असतील परंतु या अश्वारूढ महान व्यक्तिमत्त्वाचा इतिहास माहीत नसल्यामुळे अशा घटना घडतात.'


Shiv Jayanti 2021 PHOTO : शिवनेरीवर उत्साहाला उधाण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा


....आणि हा प्रवास सुरु झाला


समस्त भारतीयांना त्यांच्या राष्ट्रभाषेतून- हिंदीतून छत्रपती शिवरायांचे समग्र जीवन-चरित्र सांगूनही आपण पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो अशी कल्पना मनात तरळली. हे शिवधनुष्य आहे, ते पेलण्याची ताकद आपल्यात आहे की नाही हे जाणून घेण्य़ासाठी म्हणून आदित्यनं इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरेशी संपर्क साधला. ज्यानंतर हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय त्यानं घेतला.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या 'राजा शिवछत्रपती'पेक्षा दुसरे ओघवते आणि अस्सल साहित्य ते कुठले! शा या महान ठेव्याचा अभ्यास आदित्यनं पुन्हा सुरु केला.


....असी रोवली गेली मुहूर्तमेढ


'शिवाजन्म' हा पहिला एपिसोड राजा शिवछत्रपतीची ९९ पानं संक्षिप्त करून १००० शब्दात लिहून (तेही हिंदीतून) पूर्ण झाला, तरी काही यात अपूर्ण आहे असं त्याला वाटत राहिलं. हिंदी भाषा कागदावर होती पण समाधानकारक नाही, ज्यानंतर आदित्यनं वझे केळकर महाविद्यालयातील हिंदी विषयाचे भरत कृष्णा भेरे सर यांची मदत घेतली. सरांना संकल्पना आणि व्याप्ती सांगताच त्यांनी आनंदाने ताबडतोब होकार दिला, अस्सल हिंदी भाषेचे संस्कार त्यांनीच पूर्ण केले. युट्यूब माध्यम असल्यामुळे आता व्हिज्युअलचा प्रश्न होता, खरं तर मला प्रसंगानुरूप चित्र यावीत असं वाटत होतं परंतु आर्थिक गणितांवर येऊन हा वेग काहीसा मंदावला.


...ऑनलाईन लेक्चरचा असाही फायदा


आदित्यनं कामाचा भाग म्हणून एक दिवस ऑनलाइन लेक्चरमध्ये सहज शिवचरित्र विषय घेतला, उपक्रम मुलांना सांगितला, वर्ग FY चा होता, ऑनलाइन असल्यामुळे अजून या मुलांना बघितलेलंही नाही, तर भेटणार कुठून, परंतु त्यातून एक विद्यार्थी स्वरांग गायकर पुढे आला आणि त्याने 'मदत करायला आवडेल सर' म्हणत प्रतिक्रिया नोंदवली. मला वाटलं मुलांचा सुरुवातीचा उत्साह असतो तसाच याचाही असेल, परंतु आजच्या तारखेपर्यंत या प्रोजेक्ट मधले सगळे हे शिवकार्य स्वतःचे कार्य मानून सहयोग देतायत. आपल्या जीवनातील हे वळण म्हणजे जणू महाराजांचाच आशीर्वाद असं आदित्य अभिमानानं आणि तितक्य़ाच आत्मियतेनं सांगतो.



महाराजांच्या शौर्यगाथा, इतिहास जास्तीतजास्त भरतीयांपर्यंत  पोहचवावा, हाच मानस उराशी बाळगून आदित्य आणि त्याच्या काही साथीदारांनी याची सुरुवात केली खरी आता त्यांचा हाच प्रवास अधिकाधिक जनमानसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही जबाबदार नेटकऱ्यांची आणि अर्थातच तमान शिवप्रेमींची आहे. यंदाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021) शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांचरणी केलेला मानाचा मुजराच आहे असं म्हणायला हरकत नाही.