मुंबई : तंबाखूजन्य गुटखा पदार्थांचे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी घोळ टोलनाका परिसरात कारवाई करत 1 लाख 25 हजार 400 रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा असा एकूण 11 लाख 92 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी कारवाई केली आहे. घोळ टोलनाका परिसरात संशयित वाहनांची तपासणी करत असताना टेम्पो क्रमांक एम.एच 48 ए. वाय 9583 या वाहनाची झडती केली असता, पोलिसांना तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत 1 लाख 25 हजार 400 रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा असा एकूण 11 लाख 92 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा अवैध गुटखा टेम्पोमध्ये असणाऱ्या कपड्यामध्ये लपवून वाहतूक होत होता.
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अटक केलेल्या आरोपीविरोधात कासा पोलीस ठाण्यात भादविस कलम 328, 272, 273, 188, 34 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमाने प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.