Chhaava Movie Deleted Scene: सगळीकडे फक्त छावा (Chhaava Movie) , छावा आणि छावाच... जिकडे जावं तिकडे चर्चा रंगलीये फक्त विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमाची. 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरलेला 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेच, पण त्यासोबत समिक्षकांनीही या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. पण, 'छावा'चा इथपर्यंतचा प्रवास तसा अडचणीचाच ठरला. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अडचणींत सापडला. चित्रपटांतील काही दृश्यांवरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दिग्दर्शकांनी ती दृश्य काढून टाकण्याची हमी दिली आणि वाद निवळला. त्यानंतर चित्रपटाला कात्री लागली सेन्सॉरची. यावेळी चित्रपटातील अनेक दृश्य काढून टाकण्यात आली. असाच एक डिलीटेड सीन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
'छावा' चित्रपटातून अभिनेत्री दिव्या दत्ताचा डिलिट केलेला सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यातील संवादाचा हा सीन आहे. यातील डायलॉग्स जबरदस्त आहेत. त्यामुळे हा सीन चित्रपटात का दाखवला नाही? अशी विचारणा नेटकऱ्यांकडून होत आहे. काढून टाकण्यात आलेला हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या सीनवर दिव्या दत्तानंही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'छावा'मध्ये दिव्या दत्तानं राजमाता सोयराबाई (राजाराम महाराजांच्या मातोश्री) यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील हंबीरराव मोहिते यांचा आणि सोयराबाईंच्या संवादाचा सीन काढून टाकण्यात आला. मात्र, आता चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचा हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री दिव्या दत्तानं नुकतीच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना दिव्या दत्तानं या डिलीट करण्यात आलेल्या सीनवर भाष्य केलं आहे. दिव्या दत्ता म्हणाली की, "तो सीन सोशल मीडियावर पाहून मीसुद्धा चकीत झाले. अर्थातच तो माझ्या सर्वात आवडीच्या सीन्सपैकी एक होता. पण ठीक आहे, असं होत राहतं. ते काही माझ्या हातात नव्हतं. पण चांगली गोष्ट ही आहे की, चित्रपटाला आणि मला खूप प्रेम मिळतंय. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, तो सीन चित्रपटात असता तर मला खूप आनंद झाला असता. पण ठीक आहे, माझी काही तक्रार नाही..."
'छावा'मध्ये छत्रपती संभाजी राजे ज्यावेळी औरंगजेबाचा मुलगा अकबरला भेटतात, त्यावेळी त्यांना सोयराबाईंच्या कटकारस्थानांबाबत माहिती मिळते. संभाजी राजांना अतीव दुःख होतं. त्यानंतर ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव (सोयराबाईंचे भाऊ आणि स्वराज्याचे सरसेनापती) जाऊन सोयराबाईंची भेट घेतात. हंबीरराव सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करून देतात आणि त्यांच्या मनात त्यांनी जी ध्येय बाळगली आहेत, त्यावर पुर्नविचार करण्याचा परखड सल्ला देतात. यादरम्यानचा दोघांमधील संवाद या व्हायरल होणाऱ्या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. हा सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, हा सीन चित्रपटात दाखवायला हवा होता, अशा कमेंट्सही नेटकरी करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :