कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणी पकडून दिले याचा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणल्यानंतर नागपुरातील प्रशांत कोरटकरने सोमवारी मध्यरात्री फोन करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. यानंतर प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून नागपूरमध्ये पोलिसांचे पथक पोहोचले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे. त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी दिली आहे.
मोबाईलच्या लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न
कोल्हापुरातून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकामध्ये पाच पोलिसांचा समावेश असून पोलीस त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मोबाईल स्विच ऑफ असल्याने अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे काल कोल्हापूरमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरमध्ये मिरज तिकटी परिसरात आणि निवृत्ती चौकामध्ये अर्ध शिवाजी पुतळा चौकामध्ये कोरटकरचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रशांत कोरटकर आणि सरकारविरोधात सुद्धा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकारने कोरटवर कारवाई करावी अन्यथा गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकरच्या घरी पोहोचले
दरम्यान, कोरटकरच्या शोधात असलेल्या कोल्हापूर पोलिसांचे पथक त्याच्या नागपुरातील घरात पोहोचले आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून कोरटकरच्या घरात माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या