नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी रेल्वे प्रवासाची घोषणा केल्यानंतर त्याला रेल्वे मंत्रालयाचीही परवानगी मिळाली. याचा आनंद साजरा होत नाही तोच आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा कलाविश्व अर्थात चित्रपट दुनियेला अधिकाधिक दिलासा देणारी आहे.
केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारीपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या प्रत्येक शो साठी 100 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिली आहे. याचसंबंधी मुंबईतील अंधेरी भागात असणाऱ्या सिनेपोलीस या चित्रपटगृहातील हेड ऑफ ऑपरेशन्स अमित मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना काही महत्त्वाची माहिती दिली.
मिश्रा यांनी यावेळी तिकीट बुक करण्यापासून चित्रपटगृहातील प्रवेशाच्या वेळी होणारं निर्जंतुकीकरण, तापमान तपासणी, खाण्याच्या काऊंटवर सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची अट, शिवाय स्वच्छता गृहांमध्येही याचसंबंधीचे निकष, विविध चित्रपट सुरु आणि संपताना दरम्यानच्या वेळातील सर्व व्यवस्था यांसंदर्भातील माहिती दिली.
जवळपास वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा या रुपेरी पडद्याचा झगमगाट खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे, त्यामुळं प्रेक्षकांमधूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, केंद्राच्या या आदेशानंतर महाराष्ट्र शासनानं मात्र यासंदर्भातील कोणतीही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेली नाही. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना आतापर्यंत फक्त् तामिळनाडू आणि गुजरातमध्येच लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भातील सूचना लागू होताच एक नवी सुरुवात येथील चित्रपटगृहांमध्ये होणार आहे.