Ketaki Chitale : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिनं केलेल्या पोस्टनंतर, आता तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोरंजन विश्वातूनही उमटत आहे. तिने पोस्ट केलेला मजकूर हा आक्षेपार्ह असून, त्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा अनेक कलाकारांनी घेतला आहे. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.


केतकीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये संत तुकोबा महाराजांचा देखील उल्लेख असल्याने वारकरी सांप्रदाय देखील तिच्यावर संतापला आहे. मात्र, आता कलाकार देखील केतकीवर टीका करत आहेत.


अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी : अभिनेत्री आसावरी जोशी


केतकी चितळे या अभिनेत्रीने शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह असलेला मजकूर पोस्ट केला आहे. हे खूप गंभीर आहे. तिच्यावर कारवाई व्हायला हवी. शिवाय ज्यांनी हा मजकूर लिहिला आहे, त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी. आणखी एक धक्कादायक म्हणजे जो मजकूर लिहिण्यात आला आहे, त्यामध्ये तुकोबारायांच्या अभंगाचा विपर्यास करण्यात आला. अशा प्रवृत्तीविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी, असे अभिनेत्री आसावरी जोशी यांनी म्हटले आहे.


खरा बोलवता धनी कुणी औरच : अभिनेत्री सविता मालपेकर


तिची पोस्ट वाचून प्रचंड सातप आला आहे. शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केतकी चितळे या अभिनेत्रीने केलं आहे, ते अतिशय संताप आणणारे आहे. केवळ प्रसिध्दीसाठी अशा प्रकारची वक्तव्य करण्यात येतं आहेत. हे गंभीर आहे. केतकी विरोधात कडक करवाई व्हायला हवी. कोण आहे ही केतकी? तिचं असं काय कर्तृत्व आहे? जिला एक साधी मालिकेतील भूमिका टिकवता आली नाही, ती इतक्या मोठ्या माणसाबद्दल कशी बोलू शकते? शरद पवार हे आम्हाला वडिलांसमान आहेत. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे. तुझे शब्द मागे घे आणि शरद पवार यांची माफी माग, अशी मागणी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केली आहे.


मला हे वाचून वाईट वाटलं : मानसी नाईक


अभिनेत्री मानसी नाईक हिने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मानसी म्हणाली की, ‘मला हे वाचून खरंच वाईट वाटलं. आपण मराठी कलाकार आहोत. कुणाबाबतही असं बोलणं आक्षेपार्ह आहे. ती जे बोलली ते मला आवडलेलं नाही. आपल्या सर्वांसाठीच ते एक मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल असा विचार करणंच खूप चूक आहे. अशी चूक पुन्हा कुणी करू नये म्हणून कठोर कारवाई झालीच पाहिजे.


उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात : किरण माने


केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छितो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीअर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की 'लेडीज कार्ड' खेळून 'गैरवर्तना'चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा 'गट' जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या. कुणाच्याही चारीत्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल त्यांनी केलेले अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत.


संबंधित बातम्या :