Sadabhau Khot on State Govt : शेतकरी कर्जमाफीच्या नावावर राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. त्यामुळं शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. आत्महत्या करत आहे.  त्यामुळे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची असल्याचे खोत म्हणाले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कोण सोडविणार? नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढतच जातील, असेही खोत यावेळी म्हणाले.


सदाभाऊ खोत यांचे 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान महाराष्ट्रभर सुरु आहे. यावेळी लातूरमध्ये त्यांचा दौरा आला असता आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेलाव्यात खोतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.ऊस तोडणीअभावी ऊस शेतात पडून आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कोण सोडविणार? नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढतच जातील. असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभेवर देखील सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकरी कुठं होता मला सांगा? असा सवाल यावेळी त्यांनी केला. आता आपल्यालाच ह्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारावा लागेल आणि गावागावांत जाऊन जनतेची मदत करावी लागेल असे ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड, माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


उद्योगपती तुपाशी आणि शेतकरी उपाशी हा न्याय झाला तर गळफास लावून स्वतःवर अन्याय करण्याची ही रीतच होऊन जाईल असे खोत म्हणाले. बीड जिल्ह्यातील माझा तरणाबांड शेतकरी ऊसाचा फड पेटवतो आणि त्यामध्ये मधोमध लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करतो. हे महाराष्ट्रातील आजच भयानक वास्तव असल्याचे ते म्हणाले. म्हणून पक्षभेद विसरुन शेतकरी प्रश्नावर आपण सगळ्यांनी जागरुक असायला हवं. निवडणुकीसाठी ज्याला जायचं तिकडं जाऊ द्या पण शेतकरी म्हणून आपण एकत्र येऊन लढुया असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.