Honey Singh on Gulzar Songs : सिनेइंडस्ट्रीमधील गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) नेहमीच चर्चेत राहतो. त्याने चित्रपटांसाठी तसेच पॉप इंडस्ट्रीतही अनेक हिट गाणी दिली आहेत. हनी सिंहने आपल्या मेहनतीने आपले स्टारडम बनवले आहे. कधीकाळी हनी सिंहची गाणी ही टॉप ट्रेंडिंगला असायची. मात्र, त्याने लिहिलेल्या काही गाण्यामुळे हनी सिंगला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. हनी सिंहने याच मुद्यावर बोलताना ज्येष्ठ गीतकार गुलजार (Gulzar) यांच्या गाण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हनी सिंहने काय म्हटले?
हनी सिंहच्या अनेक गाण्यांवर प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, गाण्यांवर होणाऱ्या टीकेवर त्याने मौन बाळगत टीकाकारांना कोणतेही उत्तर दिले नव्हते. मात्र, त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गाण्यावरील टीकेवर मौन सोडले आहे.
हनी सिंहने नुकतीच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गुलजार यांनी लिहिलेल्या गाण्यांवर प्रश्न उपस्थित केले. हनी सिंहने म्हटले की, ज्यावेळी ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी अशा प्रकारची गाणी लिहिली, त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली नाही. त्यांच्याकडे अशी अनेक गाणी आहेत ज्यांमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले नाही. त्यांच्याबाबतीच वेगळं धोरण का, असा सवाल त्याने केला.
हनी सिंहने पुढे म्हटले की, गुलजार यांच्या बीडी जलइले आणि नमक इश्क या सारख्या गाण्यांवरही कधी टीका झाली नाही. या गाण्यात एका महिलेच्या जीभेवर बोलले जात आहे, त्यात काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. तरीदेखील लोकही गाणी आवडीने ऐकतात आणि आनंद घेतात. हनी सिंहने पुढे म्हटले की आता, ''चोली के पीछे क्या है?'' या वादग्रस्त गाण्याचा समावेश सिनेइंडस्ट्रीतील सुपरहिट गाण्यांच्या यादीत होतो.
या चित्रपटसृष्टीत खूपच दुटप्पीपणा असल्याचे हनी सिंहने म्हटले. त्याने पुढे म्हटले की, मी कधीच अशा टीकांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे मला सहज टार्गेट केले गेले. परंतु आता मी स्वतःचा बचाव करण्यास तयार आहे. मला कोणी काहीही बोलले तर उत्तर देणार असल्याचे हनी सिंहने म्हटले.