Yana Gupta Actress Model : बॉलिवूडमध्ये (Bollywood)  एकेकाळी  आयटम साँगची (Item Song) लाट आली होती. त्यातील काही गाणी आजही सिनेरसिकांच्या लक्षात आहेत. आजही ही गाणी धुमाकूळ घालतात. सेलिब्रेशन असो किंवा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम यामध्ये ही गाणी वाजतात. 2003 मध्ये आलेल्या विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), दिया मिर्झा (Dia Mirza), अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांची भूमिका असलेला 'दम' (Dum Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा दम दाखवता आला नाही. पण, यातील आयटम साँग आजही लोकप्रिय आहे. 'बाबूजी जरा धीरे चलो' (Babuji Zara Dheere Chalo) हे गाणं आजही लोक ऐकतात. या गाण्यावर थिरकणारी याना गुप्ता स्टार झाली होती.  मात्र, ही याना गुप्ता अचानक कुठं गायब झाली?


'बाबूजी जरा धीरे चलो' हे गीत सीर अंजान यांनी लिहिले होते. तर, संदीप चौटा यांनी संगीतबद्ध केले होते. 'दम' चित्रपटातील या गाण्याने धुमाकूळ घातला होता. मात्र, याना गुप्ता सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. सध्या ती नेमकं काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात आहे. 


16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात


याना गुप्ताचा जन्म 23 एप्रिल 1979 रोजी झेक प्रजासत्ताकच्या ब्रनो येथे झाला. तिची आई भारतीय होती आणि वडील झेक प्रजासत्ताकचे नागरीक होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वडिलांनी आईला घटस्फोट दिल्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या.आईने याना आणि तिच्या बहिणीचे संगोपन केले.


शालेय शिक्षणानंतर, यानाने गार्डनिंग आणि पार्क आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. मित्रांच्या सांगण्यावरून यानाने मॉडेलिंगला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी यानाने मॉडेलिंग सुरू केले. या दरम्यान तिला या क्षेत्रातील चांगले-वाईट अनुभव आले. त्यानंतर ती व्यावसायिक मॉडेल झाली. त्यानंतर मॉडेलिंगच्या सुरुवात करणाऱ्या एजन्सीने तिला देश-विदेशात पाठवण्यास सुरुवात केली. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत तिने मॉडेलिंग केले. त्यानंतर तिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात ओशोंच्या आश्रमात प्रवेश घेतला. 


लग्नानंतर घटस्फोट आणि मग भेटले डब्बू रतनानी


ओशोंच्या आश्रमात यानाची  सत्यकाम गुप्ता यांची भेट झाली. त्या ठिकाणी तो रंगकाम करायचा. या दोघांनी 2001 मध्ये लग्न केले पण 2005 मध्ये ते वेगळे झाले. मात्र, त्यानंतर याना आपल्या देशात परतली नाही. ती भारतातच राहिली आणि पुन्हा मॉडेलिंगमध्ये आली. मात्र, तिच्यासाठी ही बाब आव्हानात्मक होती. येथे ती कोणालाच ओळखत नव्हती. मग त्याने मोठमोठे छायाचित्रकार शोधले आणि शेवटी फारुख चोठिया आणि डब्बू रतनानी यांचे फोन नंबर मिळाले. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर  त्यांनी त्यांचे फोटो मागवले.


लॅक्मेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर


डब्बू रतनानीने यानाचे फोटोशूट केले . त्यानंतर लॅक्मेने तिला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. याना अनेक जाहिरातींमध्ये दिसू लागली. ती व्यावसायिक जगात प्रसिद्ध झाली. 


बिपाशाच्या नकाराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री


दिग्दर्शक ईश्वर निवास त्याच्या 'दम' चित्रपटातील आयटम नंबरसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते.  आधी त्यांनी बिपाशा बसूला विचारणा केली. पण, बिपाशाने तारखा नसल्याने त्यांना नकार दिला. यानंतर याना गुप्ताला ही ऑफर मिळाली. 'बाबूजी जरा धीरे चलो...' या गाण्याचे शूटिंग पाच दिवस चालले. यानाने हा अनुभव चांगला नसल्याचे म्हटले होते.  आधी रिर्हसल आणि त्यानंतर शूटिंगमध्ये वेळ गेला असल्याचे तिने सांगितले.


याना गुप्ताने एकदा सांगितले होते की एका दिग्दर्शकाने तिला सांगितले होते की तो एक चित्रपट देईल ज्यामध्ये जास्त संवाद नसतील. तुम्हाला फक्त बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर इकडे तिकडे पळावे लागेल. चित्रपटात लोक फक्त माझ्या सेक्स अपीलसाठी मला कास्ट करायचे अशी खंत यानाने व्यक्त केली. 


ग्लॅमरशिवाय भूमिका करायची होती.


'बाबूजी जरा धीरे चलो' नंतर याना गुप्ताला अनेक आयटम नंबर ऑफर करण्यात आले होते. मनमाधन या तमिळ चित्रपटात एक आयटम साँग केले आणि तेही गाजले. यानंतर घर्षण  या तेलुगू चित्रपटातही तिने आयटम साँग केले. सागर बेल्लारीने तिला 'भेजा फ्राय'मध्ये रजत कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत कास्ट केले होते. पण नंतर याना गुप्ता ऐवजी सारिकाची वर्णी लागली. 


रिॲलिटी शोमध्ये सहभाग... 


'खतरों के खिलाडी'मध्येही ती झळकली होती. तिने 'How to Love Your Body: And Have the Body You Love' हे पुस्तकही लिहिले. हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झाले होते. 


ती सध्या काय करते?


याना गुप्ता ही 2018 मध्ये दशहरा या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती मुंबईहून गोव्यात स्थलांतरीत झाली. याना सध्या योग, मेडिटेशन आणि अध्यात्म यावर काम करत आहे.