पुणे : गेल्या 30 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने राजकीय मंडळींशी चांगले संबंध आहेत. मात्र कधीही राजकारणात जाणार नसून त्यापासून लांब राहणार असल्याचं पाणी फाऊंडेशनचे संयोजक आणि सिनेअभिनेता आमिर खान यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.


पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जाऊ नका, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला होता.

राजकारणात असल्यावरच सामाजिक क्षेत्रात काम करता येतं, असं नाही. राजकारणाच्या बाहेर राहूनही चांगलं काम करता येतं, असं आमिर यांनी सांगितलं.

चांगल्या कामाच्या जोरावर राज्यसभेवर जाणार का? या प्रश्नावर आमिर खान यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेणार आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास लवकरच महाराष्ट्र पाणीदार होईल. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमुळे टीम एक वर्षांसाठी ब्रेक घेण्याच्या तयारीत होती. मात्र तसं आम्ही करणार नसून अधिक चांगलं काम करणाऱ्यावर भर देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

जलसंधारणासाठी महाराष्ट्राची निवड करण्यामागील कारणही आमिर खान यांनी सांगितलं. देशातील इतर राज्यात जलसंधारणाचे काम चांगले असून त्यात मी महाराष्ट्रीयन असल्याने आपल्या राज्यात जलसंधारणाचे काम करण्याचे ठरवले. आज या कामाला तीन वर्ष पूर्ण झाले. त्या कामावर समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर या कामामध्ये आधिकाधिक तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलं.

वॉटर कप स्पर्धेचा निकाल

प्रथम क्रमांक - टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी

द्वितीय क्रमांक - भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलडाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी

तृतीय क्रमांक - आनंदवाडी (ता.आष्टी, जि. बीड) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र 'पाणीदार' करणाऱ्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर

एकाच व्यासपीठावर राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा