मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी 'तख्त' सिनेमाच्या स्टारकास्टवर नजर टाकली तर ती किती तगडी आहे हे समजेल. सिनेमात रणवीर सिंह आणि विकी कौशलही आहेत. खरंतर करणला या सिनेमात रणवीरसोबत विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरला घ्यायचं होतं. परंतु रणबीरने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे विकी कौशलची निवड करण्यात आली.
रणबीरने करण जोहरसोबत काम करण्यास का नकार दिला असेल, असा विचार तुम्ही करत असाल. रणवीर आणि रणबीरमधील समान धागा म्हणजे दीपिका पादूकोण. एकेकाळी रणबीर आणि दीपिका रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही काळाने त्यांचं ब्रेकअप झाल्यावर दीपिका आणि रणवीरचं सूत जुळलं. दोघांनी जाहीर कबुली दिली नसली तरी ते आता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यामुळे रणबीरने रणवीरसोबत काम करण्यास नकार दिला असावा, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे.
रणवीर असलेल्या चित्रपटात काम न करण्याचा रणबीरचा निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आहे. तारखा कमी असल्याने रणबीरने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. तो सध्या ब्रह्मास्त्र, शमशेरा आणि लव्ह रंजन या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे 'तख्त' सिनेमाची कथा आवडूनही त्याने करणला नकार कळवला.
दरम्यान, करणच्या 'तख्त' या सिनेमात रणवीर सिंहसह करीना कपूर खान, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. तर चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. करण जोहर स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. सुमरे दोन वर्षानंतर करण स्वत: चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी त्याने ऐश्वर्या, अनुष्का आणि रणबीर स्टारर 'ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन केलं होतं.