आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 03:29 PM (IST)
मुंबई : संघलचे राजा गंधर्वसेन यांची कन्या पद्मावती. नितळ... आरस्पानी... आणि मनमोहक... सौंदर्याची खाण. ती इतकी सुंदर होती... की तिला मिळवण्यासाठी बड्या बड्या राजांनी देव पाण्यात ठेवले होते. वडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात पद्मावतीने माळ घातली. पण या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं. पद्मावतीच्या सौंदर्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीन खिलजीनं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला. अखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं. पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली. पद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली. अखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत 700 दासी घेऊन येण्याची अट घातली. पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली. दगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात. अशी होती... चित्तोडची स्वाभिमानी राणी... राणी पद्मावती...