भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 01:31 PM (IST)
मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना राजस्थानातील जयपूरमध्ये मारहाण झाल्यानंतर, बॉलीवूडकरांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. चित्रपटाच्या कथेला आक्षेप घेत राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेने भन्साळींवर हल्ला केला. या मारहाणीनंतर अनेक दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी संजय लीला भन्साळी यांचं समर्थन केलं. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल, रितेश देशमुख, हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विट करुन, जे झालं ते अत्यंत दु:खद आणि भीतीदायक आहे. आपल्या बुजुर्गांनी हिंसा शिकवली नाही, असं म्हटलं आहे. https://twitter.com/priyankachopra/status/825113847111495682 रितेश देशमुख म्हणतो, "संजय लीला भन्साळीसोबत जे काही घडलं, ते अत्यंत खेदजनक आहे. मी संजय भन्साळींच्या पाठिशी आहे. आता राजस्थान पोलिसांनी लक्ष घालून, योग्य ती भूमिका घ्यावी" https://twitter.com/Riteishd/status/825055844551315457 फरहान अख्तर म्हणतो, "माझ्या सहकाऱ्यांनो, जर आताच आपण अशाघटनांविरोधी एकवटलो नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल" https://twitter.com/FarOutAkhtar/status/825079087693709312 अर्जुन रामपाल - "ही अहिसष्णूता नाही का? अशा वर्तणुकीमुळे तुम्ही आमच्याकडून सहिष्णूतेची अपेक्षा करु नका. याबाबत सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी आशा आहे. https://twitter.com/rampalarjun/status/825072921936814081 करण जोहर - " याप्रकरणी बॉलीवूडमधील कोणीही मंडळी शांत बसणार नाही. आपल्याला एकत्र येण्याची वेळ आली आहे". https://twitter.com/karanjohar/status/825083571547156480 भन्साळींना धक्काबुक्की जयपूरमधील जयगडमध्ये सुरु असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला. चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने त्याचा निषेध केला.