डॉ. सलील कुलकर्णी यांना आपण यापूर्वी गाण्यांच्या, कवितांच्या कार्यक्रमातून पाहिलं आहे. शिवाय संगीतकार म्हणूनही ते ख्यातनाम आहेतच. सगळं आलबेल चाललं असताना अचानक कुलकर्णी यांना दिग्दर्शनात पदार्पण करावं वाटलं. केवळ इथवर न थांबता त्यांनी आपल्याला हवी तशी गोष्ट निवडली आणि सिनेमा करायला घेतलाही. त्याच सिनेमाची ही गोष्ट. पण हा सिनेमा आपल्या फिल्मवाल्या सिनेमासारखा नाही. तर तो आहे वेडिंगचा शिनेमा. म्हणजे अलिकडे प्रिवेडिंग शूटचं जे फॅड आलं आहे, त्याभवती व्यक्तिरेखा मांडून त्याची गोष्ट रचण्यात आली आहे. अर्थातच ही गोष्ट लग्नाभवती फिरत असल्यामुळे सगळा माहोल मंगलमय आहे. यातली गंमत अशी की त्यामध्येही जगण्याच्या कल्पना, विचारांची गुंतागुंत, मांडले गेलेले आडाखे.. फिल्म करताना झालेले साक्षात्कार या सगळ्या गोष्टी असल्यामुळे हा चित्रपट केवळ लग्नसराईपुरता न उरता कौटुंबिक नातेसंबंधावर येतो आणि तो आपला वाटतो.

सिनेमाची गोष्ट गोड आहे. परी आणि प्रकाश यांचं एकमेकांवर प्रेम आहे. परी डॉक्टर आहे. प्रॅक्टिससाठी सासवडला आली असताना नायकाच्या प्रेमात ती पडते. प्रकाश घरंदाज श्रीमंत आहे. त्याचं मोबाईलचं दुकान आहे. तर लग्न ठरलं आहे. आणि लग्नाचं प्रिवेडिंग शूट करायला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने उर्वी आणि तिच्या कॅमेरामनला पाठवलं आहे. परी-प्रकाश एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. पण उर्वीचं मात्र वेगळं म्हणणं आहे. लग्नासाठी तर ती तयार नाहीच आहेच .पण प्रिवेडिंगचं शूटही तिला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग हे शूट नेमकं कसं पार पडतं.. शूट करता करता उर्वीला भेटणारी माणसं तिला काही साक्षात्कार घडवतात का.. उर्वीची लागण परी-प्रकाशला होते का.. यावर हा सिनेमा बेतला आहे.

सलील कुलकर्णी यांनी आपल्या पहिल्याच सिनेमात आपल्यातली दिग्दर्शनातली चुणूक दाखवून दिली आहे. अलका कुबल, शिवाजी साटम, मुक्ता बर्वे, भाऊ कदम, प्रवीण तरडे, शिवराज वायचळ, संकर्षण कऱ्हाडे आदींना घेऊन त्यांनी बांधलेली मोट कौतुकास्पद आहे. याची पटकथा तुम्हाला खिळवून ठेवते. हसवत राहते. खसखस पिकवते. यातले अनेक शब्द, संवादही मजा आणतात. पॉम्पलेट, ओपिनियन ऑफ डिफरन्स असे अनेक शब्द हशा पिकवतात. मल्टिटास्किंगचा सीन, उर्वीचे, प्रकाश-परीचे सीन यांनी मजा आणली आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी मात्र प्रसांगांचं प्रवाही असणं संथ होतं आणि संवाद टॉकेटिव होऊ लागतो.

ही गोष्टही तिघांची असली तरी इतर व्यक्तिरेखा अनेक असल्यामुळे या तीन व्यक्तिरेखा आणखी ठाशीव असायला हव्या होत्या असं वाटून जातं. पण त्यामुळे सिनेमा डॅमेज होत नाही.

एक फील गुड सिनेमा या दिग्दर्शकाने दिला आहे. तो नक्कीच प्रेक्षणीय आहे. अबालवृद्धांनी पाहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात सलील यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. संगीतातही सलील यांनी आपली छाप सोडली आहे. उगाचच हे गाणं छान आहे. देवीचा गोंधळही ठेकेदार. यात मुक्ताला नाचताना पाहायला मजा येते. भाऊ, प्रवीण, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या सर्वांनीच चोख कामं केली आहेत. शिवराज वायचळ आपली छाप सोडतो. रिचा इनामदार आपली छाप सोडते. पण काही प्रसंगामध्ये तिने आणखी इंटेन्स असायला हवं होतं असं वाटून जातं.

असा सगळा मामला असल्यामुळे पिक्चर-बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत, तीन स्टार्स. हा एक चांगला चित्रपट आहे. थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा.

व्हिडीओ :