Bad Newz : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) आणि तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) 'अॅनिमल' (Animal) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने होते. आता विकी कौशल आणि तृप्ति डिमरी एकत्र 'बॅड न्यूज' (Bad Newz) देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या 'बॅड न्यूज' सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटात विकी कौशल आणि तृप्ति डिमरीसह एमी विर्कदेखील (Ammy Virk) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विकी कौशलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बॅड न्यूज'ची घोषणा केली होती. सिनेमाची घोषणा करण्यासोबत रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'बॅड न्यूज' कधी रिलीज होणार? (Bad Newz Release Date)
विकी कौशलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात विकी कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क वेगवेगळ्या अंदाजात दिसून येणार आहेत. व्हिडीओ शेअर करत विकी कौशलने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. व्हिडीओ शेअर करत विकी कौशलने लिहिलं आहे,"ब्रेकिंग न्यूज ही बॅड न्यूज आहे.. तुम्ही यासाठी तयार नाही आहात...कारण आम्हीदेखील तयार नाही आहोत". विकी कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट 19 जुलै 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बॅड न्यूज अशी आहे तर गुड न्यूज कशी असेल, भाईजी वेटिंग, आणखी एक सुपरहिट चित्रपट येतोय, आता खरी मजा येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
विकी कौशलच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Vicky Kaushal Upcoming Movies)
विकी कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आनंद तिवारी यांनी सांभाळली आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट शेवटचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विकी कौशलच्या आगामी सिनेमांमध्ये 'लव अँड वॉर','छावा' आणि 'मेरे महबूब मेरे सनम' या चित्रपटांचा समावेश आहे. तृप्ति डिमरी 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटात शेवटची दिसून आली होती. 'बॅड न्यूज' चित्रपटासह तृप्ति डिमरी 'भूल भुलैया 3' या चित्रपटातही झळकणार आहे.
'या' चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार झालेला विकी कौशल!
विकी कौशलने 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन विकीने केलं होतं. त्यानंतर तो 'लव शव ते चिकेन खुराना'मध्ये दिसून आला. पण प्रसिद्धी मात्र मिळाली नाही. 'मसान' या सिनेमामुळे विकी कौशल रातोरात सुपरस्टार झाला. या चित्रपटातील 'ये दुख काहे खत्म नहीं होता बें' हा डायलॉग विकीसाठी खरा ठरला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.
'या' चित्रपटांत दिसली विकीच्या अभिनयाची झलक (Vicky Kaushal Movies)
'मसान' या चित्रपटानंतर विकी कौशल रमन राघव, संजू, मनमर्जियासह अनेक चित्रपटांत झळकला. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाने विकीला आणखी लोकप्रियता मिळाली. 'सरदार उधम' या चित्रपटात विकीचा दर्जेदार अभिनय पाहता आला. विकी कौशलचं नाव तापसी पन्नू, श्वेता त्रिपाठी आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण कतरिना कैफसोबत तो लग्नबंधनात अडकला.
संबंधित बातम्या