Rana Naidu teaser: साऊथ मनोरंजन विश्वातील दोन मोठे सुपरस्टार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) ही जोडी मोठ्या पडद्यावर लवकरच एकत्र दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘राणा नायडू’ (Rana Naidu) या वेब सीरिजमध्ये राणा दग्गुबाती त्याच्या काकासोबत अर्थात व्यंकटेश दग्गुबाती दिसणार आहेत. जेव्हापासून या वेब सीरिजची घोषणा झाली आहे, तेव्हापासून ही सीरिज बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. आज या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


‘राणा नायडू’ ही वेब सीरिज प्रसिद्ध अमेरिकन क्राईम ड्रामा वेब सीरिज ‘रे डोनोव्हन’चा (Ray Donovan) अधिकृत रिमेक आहे. राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि व्यंकटेश (Daggubati Venkatesh) यांच्याशिवाय या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सुरवीन चावला देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


पाहा टीझर :



या धमाकेदार सीरिजच्या टीझरची सुरुवात राणाच्या दमदार आवाजाने होते. कुणाला मदत हवी आहे का, असे राणा विचारतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती हिंदीत उत्तर देते की, ‘मी तुमच्या मदतीबद्दल खूप ऐकले आहे. जेव्हाही कोणता सेलिब्रिटी अडचणीत असतो, तेव्हा पहिला फोन हा नेहमी तुलाच येतो. तू सगळ्या गोष्टी सावरून घेतोस.’ यानंतर टीझरमध्ये एक दमदार फायटिंग सीन पाहायला मिळतो. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे.


काका पुतण्याची जोडी करणार धमाल!


व्यंकटेश दग्गुबाती आणि राणा पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र आले आहेत. काका-पुतण्याची ही जोडी नुसतीच एकत्र आली नाहीये, तर ती पडद्यावर मोठा धमाका देखील करणार आहे, हे या टीझरवरून लक्षात येते. ‘राणा नायडू’मध्ये दोघी दमदार भूमिकेत दिसत आहेत. या सीरिज मध्ये व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh), राणा दग्गुबातीच्या (Rana Daggubati) वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सीरिजच्या कथेत जेव्हा राणाच्या वडिलांची अर्थात व्यंकटेश यांची तुरुंगातून अनपेक्षितपणे सुटका होते, तेव्हा सुरु असलेल्या या ड्रामावरून पडदा उठतो. त्यानंतर यात नवी खेळी सुरु होते. यानंतर नायडू कुटुंबाला हादरवून सोडणाऱ्या घटनांची साखळी सुरू होते.


बऱ्याच दिवसांपासून चाहते या दोन्ही कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता काहीच दिवसात संपणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन करण अंशुमन आणि सुपरण वर्मा यांनी केले आहे.


हेही वाचा :


Happy Birthday Rana Daggubati : जाणून घ्या 'बाहुबली' फेम राणा दग्गुबातीबाबत खास गोष्टी


Video : राणा दग्गुबातीने हिसकावला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याचा फोन, रागावण्याऐवजी चाहते झाले खुश! पाहा नेमकं काय झालं...