Valentines day 2023 Special Sahir Ludhianvi Amrita Pritam Love Story : प्रेम अमर आहे. त्याला जात, धर्मासह कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट ही पात्रं आज नसली तरी त्यांच्या प्रेमकथा आजही जिवंत आहेत. त्याचप्रकारे कवी साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) आणि लेखिका अमृता प्रितम (Amrita Pritam) यांची अनोखी प्रेमकहाणी ऐकून डोळे पाणावतात. त्यांच्या प्रेमकथेला बॉलिवूडची सर्वात मोठी प्रेमकथा (Sahir Ludhianvi Amrita Pritam Love Story) म्हटलं जातं. 


अमृता-साहिरच्या नात्याची सुरुवात कशी झाली? 


अमृता-साहिर यांच्या नात्याची सुरुवात 72 वर्षांपूर्वी 1944 साली सुरू झाली. साहिर (Sahir Ludhianvi) त्यावेळचे लोकप्रिय कवी होते. 1944 साली ते पहिल्यांदा लेखिका अमृता प्रीतम (Amrita Pritam) यांना लाहोर आणि दिल्लीच्यामध्ये वसलेल्या प्रीतनगरात भेटले. प्रेमाच्या शहरात 'मुशायरात' या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ते पहिल्यांदा भेटले. साहिर हे आदर्शवादी होते तर अमृता या खूपच प्रेमळ होत्या. त्यांची प्रेमकहाणी एका वेगळ्या दिशेने सुरू झाली ज्याचा कधीच शेवट झाला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रेम कहाणीला 'अधुरी प्रेम कहाणी' म्हटलं जातं. 


अमृता ज्यावेळी साहिर यांना पहिल्यांदा भेटल्या त्यावेळी त्यांचं प्रीतम सिंहसोबत लग्न झालेलं होतं. त्यांच्या बालपणीच आई-वडिलांनी हे लग्न ठरवलेलं होतं. वैवाहिक आयुष्यात त्या खूश नव्हत्या. पण साहिर यांना भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवा ट्विस्ट आला. अमृता दिल्लीत राहणाऱ्या होत्या तर साहिर लाहोरमध्ये. त्यामुळे पत्रांच्या माध्यमातून ते एकमेकांसोबत संवाद साधत असे. अमृता त्यांना माझा कवी, माझा प्रियकर, माझा देव असं म्हणत पत्र लिहित असे. यामुळे त्या साहिर यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या याचा अंदाज येतो. पण ते कधीच प्रत्यक्षरित्या एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलले नाहीत. साहिर यांनी कधीच अमृता यांना लग्नाबाबत वचन दिलं नाही. साहिर यांना अमृता आवडत असल्या तरी प्रेमबंधनात राहणं पसंत नसल्याने किंवा अमृता यांचं एक लग्न झालेलं असल्याने त्यांनी कधीच त्यांचं प्रेम व्यक्त केलं नाही. त्यामुळेच असं म्हटलं जातं की 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं' असं शब्दात मांडणार गीतकार खरी प्रेमिका जवळ आल्यावर मात्र नि:शब्द झाला. साहिर यांच्याकडे शब्दांची श्रीमंती असली तरी प्रेम व्यक्त करण्यात मात्र त्यांचे शब्द अपुरे पडले. 






अमृता यांनी मात्र 'एक मुलाकत', 'खाली जगह', 'एक पत्र','सिगरेट' अशा वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून आपल्या मनातल्या गोष्टी कागदावर उतरवल्या. पुढे फाळणीनंतर साहिर मुंबईत आले. तरीदेखील अमृताने साहिरवर प्रेम करणं सुरूचं ठेवलं. प्रेम व्यक्त करण्याचं त्यांचं माध्यम आता साहित्याने घेतलं. 'इक सी अनीता' आणि 'दिल्ली दिया गलीया' या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी आपले अनुभव लिहिले. 'सुनहरे' या साहिरसाठी लिहिलेल्या कवितासंग्रहाला 'साहित्य अकादमी पुरस्कार'देखील मिळाला आहे. अमृता अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत असल्या तरी त्यांचा मात्र अपेक्षाभंगच झाला. साहिरकडून त्यांना कधीच काही उत्तर मिळालं नाही. 


कप अन् सिगारेट ठरलं प्रेमकहाणीचं प्रतीक


साहिर नेहमी अर्धी सिगारेट तशीच ठेवत असे. एकदा अमृता यांनी त्यातली एक सिगारेट उचलली आणि ते पेटवली. त्यावेळी सिगारेट ओढत असताना साहिर आपल्या सोबत असल्याचा त्यांना भास झाला. त्या दिवसापासून त्यांना सिगारेटची सवय लागली. त्याचप्रमाणे साहिर यांच्या घरीदेखील टेबलावर एक कप होता. त्या कपात अमृता एकदा चहा प्यायल्याने त्यांनी तो कप कधीच कोणाला उचलू दिला नाही. त्यामुळे कप आणि सिगारेट त्यांच्या मूक प्रेमकहाणीचं प्रतीक ठरलं आहे. 


शब्दांची श्रीमंती असलेले दोन्ही प्रतिभावन माणसं. एक कवी तर एक लेखिका... पण एकमेकांसमोर त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना कधीच व्यक्त केल्या नाही. त्यामुळे त्यांची शब्दसंपत्ती त्यांच्या प्रेमापुढे मात्र कमी पडली. ही प्रेमकहाणी एकतर्फी नसली तरी अव्यक्त न झालेली असफल अशी आहे. त्यामुळेच या बहुचर्चित प्रेमकहाणीला 'अधुरी प्रेम काहाणी' म्हटलं जातं.


संबंधित बातम्या


Blog : भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं गोड स्वप्न, अजरामर 'साहिर'