Blog : नुकतंच प्रेमात पडलेल्या प्रियकराला आपल्या प्रेयसीला प्रपोज करताना आणि प्रेमात अपयशी ठरल्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रियकराला ज्यांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो, अशा कवी, शायर आणि गीतकार साहिर लुधियानवी यांची आज पुण्यतिथी. प्रत्येक वर्षी 25 ऑक्टोबरला खूप काही गमावल्याची अनामिक हुरहूर जाणवते आणि भावनांचा महापूर दाटून येतो. मग पुन्हा पुन्हा इतिहासाची पानं चाळावी लागतात. मग त्या प्रत्येक पानांतून डोळ्यासमोर उभा राहतो साहिरजींचा जीवनप्रवास...!


8 मार्च 1921 म्हणजे, बरोबर शंभर वर्षांपूर्वी साहिर लुधियानवी यांचा जन्म पंजाबमधील मोठ्या जमीनदार कुटुंबात जन्म झाला. साहिर यांचं खरं नाव अब्दुल हयी. विशीत असलेल्या अब्दुल यांनी कवितेसाठी साहिर नाव धारण केलं, जे आज 100 वर्षांनंतरही आपण त्यांना साहिर याच नावाने ओळखतो. समजायला लागल्यापासूनच साहिरजी बंडखोर विचारांचे होते. पुढे त्याच बंडखोर विचारांना शब्दांची ताकद मिळाली आणि भारतीय चित्रपटसृष्टीला अजरामर कवी शायर गीतकार मिळाला. 


बंडखोर, पुरोगामी,संवेदनशील साहिरजी!
साहिरजी हे खरं तर साम्यवादी आणि नास्तिक विचारांचे... आपल्या लेखणीतून त्यांनी वंचित पीडितांच्या व्यथा जगासमोर आणल्या. क्रांतीवर त्यांचा विश्वास होता... म्हणून तर त्यांनी 'साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोज उठाना', 'वो सुबह कभी तो आयेगी' अशी क्रांतीने भारलेली गीतं लिहिली. जातपात त्यांना मान्य नव्हती. वेळोवेळी त्यांनी आपल्या लेखणीतून जातीव्यवस्थेवर आसूड ओढले. 1959 साली प्रसिद्ध झालेल्या 'धूल का फूल' चित्रपटामध्ये 'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद तू इन्सान बनेगा' हे गीत लिहून कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात मारली. तर दैववादावर प्रहार करताना 'आसमाँ पर है खुदा और जमीं पर है हम', असं उपरोधिक गीत लिहिलं. समाजातली विषमता, दारिद्र्य, जातपातसंघर्षावर रोखठोक सवाल करणारं 'जिन्हे नाज हैं दिंद पर वो कहाँ है?', असे शब्द लिहून त्यांनी शीर्षस्थ नेत्यांना सवाल केले.  
 
'आजादी की राह पर' या हिंदी चित्रपटातून 1949 साली साहिरजींनी आपल्या गीत लेखनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. परंतु पहिल्या चित्रपटातून त्यांना म्हणावी अशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर संगीतकार सचिन देव बर्मन अर्थात एस डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी 'नौजवान' या चित्रपटासाठी गीत लेखन केलं. याच चित्रपटातल्या 'ठंडी हवाऐं लहराकर आयें' या गीताने ते घरोघरी पोहोचले. याच गीताने त्यांना नवी ओळख मिळाली. नंतर साहिरजींनी 'बाजी', 'प्यासा', 'फिर सुबह होगी', 'कभी कभी' अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गीतं लिहिली. एस. डी. बर्मन यांच्यासहित त्यांनी एन. दत्ता, शंकर जयकिशन, खय्यम, ओ.पी नय्यर अशा दिग्गज संगीतकारांशी काम केलं. पण हे काम करताना त्यांची बंडोखोरी त्यांनी सुरुच ठेवली, मग ती वागण्या-बोलण्यातील असो किंवा गीतातली...!


उदाहरणच द्यायचं म्हटलं तर, प्यासा चित्रपट... भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील अनेक देशांतील नागरिकांच्या मनावर प्यासामधील गीतांनी मोहिनी घातली. प्यासामधली गाणी कानावर पडली की लोकं बेभान होऊन जायचे. मग हे यश कुणाचं? गीतकार असलेल्या साहिरजींचं की संगीत दिलेल्या एस. डी. बर्मन यांचं...? साहजिक आशयपूर्ण शब्दांमुळे गाण्याला ताकद मिळाल्याने हे यश साहिरजी स्वत:चं मानत होते तर एस डी बर्मन यांना हे मान्य नव्हतं. दोघांमधला वाद विकोपाला गेला. पुढे व्हायचं ते झालंच. अठरा चित्रपट सोबत केलेल्या सख्या दोस्तांची ताटातूट झाली.


ओपी नय्यर यांच्यासोबतचा साहिरजींचा असाच किस्सा... नया दौर हा सिनेमा देखील प्रचंड गाजला तो त्यातील गीतांमुळे... नंतरही हाच प्रसंग, हे यश साहिरचं की ओपी नय्यर यांचं? पुन्हा नय्यर आणि साहिरजींमध्ये तू तू मैं मैं झालं....! कारण नय्यर हे ही अगदीच हट्टी आणि इगोस्टिक होते. प्रवाहाविरुद्ध जाऊन यश मिळवायंच हे त्यांना माहिती होतं. म्हणून नया दौरचं यश हे साहिरजींचं मानायला ओपी तयार नव्हते.


साहिरजींच्या शब्दांची अफाट ताकद होती. आपल्या जादुई शब्दांनी कोणत्याही प्रसंगाला ते रसिकांसमोर गाण्याच्या माध्यमातून हुबेहूब उभे करायचे. मग नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमवीराची अवस्था सांगताना तथा साथीदाराचं वर्णन करत 'तेरे चेहरे से नजर नही हटती हे गीत असो की प्रेमात आलेल्या अपयशानंतर आलेली बैचेनी व्यक्त करताना 'मेरे दिल में खयाल आया हैं' हे गीत असो. समाजातल्या अंतर्विरोधांवर जळजळीत भाष्य करणारं 'ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया, ये इन्सां के दुश्मन समाजो की दुनिया', हे गीत लिहून त्यांनी त्यांचं द्रष्टेपण दाखवून दिलं.
  
गाण्यांसाठी रॉयल्टी मिळवणारे साहिर हे पहिले गीतकार होते. आकाशवाणीवर गाण्यांच्या प्रसारणावेळी गायक आणि संगीतकारांसोबतच गीतकारांचाही उल्लेख होऊ शकला, हे केवळ साहिर यांच्यामुळेच शक्य झालं. यापूर्वी, गाण्यांच्या प्रसारणाच्या वेळी फक्त गायक आणि संगीतकाराच्या नावांचा उल्लेख होत असे.


साहिरजींची मनाला भिडणारी गीतं
साहिरजींची अशी काही मनाला भिडणारी गीतं आहेत ऐकल्यानंतर 'तृप्त होणे' या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजू शकतो. 'तेरे चेहरे सें नजर नही हटती', 'अभी ना जाओ छोडकर', 'कभी कभी मेरे दिल में', 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया', 'उडे जब जब जुल्फें तेरी', 'हम आपकी आँखो में', 'मैं पल दो पल का शायर हूँ', 'ये मेरी जोहर जबी', 'जो वादा कियाँ वो निभाना पडेगा', 'माँग के साथ तुम्हारा, मैंने माँग लियाँ संसार', 'मोहब्बत बडे काम की चीज हैं', 'जानेमन तुम कमाल करती हो', 'जीवन के सफर में राही', अशी हिट गीतं लिहून साहिरजींनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 


साहिरजींच्या आयुष्यातील दोन अूपर्ण प्रेमकहाण्या...!
हे सगळं जरी असलं तरी अशा दोन घटनांना उल्लेख केल्याशिवाय साहिरजींचा जीवनप्रवास पूर्ण होऊच शकत नाही, त्या दोन घटना म्हणजे, अमृता प्रीतम आणि साहिरजींमधली अपूर्ण प्रेमकहाणी आणि पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा यांच्यावर साहिरजींचं असलेलं एकतर्फी प्रेम...!


साहिरजी आणि त्यांची मैत्रीण अमृता प्रीतम लाहोरमधल्या कॉलेजात एकत्र शिकायला होते. तिथेच मैत्री जुळली. विचार जुळले.. पण त्यांची मैत्री अमृताच्या घरच्यांना मान्य नव्हती. काही काळानंतर दोघांची ताटातूट झाली. दरम्यानच्या काळात अमृता यांचं लग्न प्रीतम सिंग यांच्याबरोबर झालं. पुढची काही वर्ष अमृता आणि प्रीतम एकमेकांबरोबर राहिलेही. पण नंतरच्या काही दिवसांत अमृतांनी प्रीतमबरोबर फारकत घेतली. नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. पुढच्या काही वर्षांनी एका मुशायऱ्याच्या कार्यक्रमात दोघेजण पुन्हा भेटले. नंतर भेटीगाठींचा सिलसिला सुरु झाला. 


साहिरजी जेव्हा अमतृच्या घरी जायचे तेव्हा ते अमृताबरोबर फार बोलायचे नाही, अबोल राहायचे. सिगारेट ओढण्याचा त्यांना छंद होता. एकामागून एक कित्येक सिगारेट ते ओढत राहायचे. एक अख्खी सिगारेट ते प्यायचे नाहीत. अर्धी सिगारेट संपली की दुसरी सिगारेट पेटवायचे. उरलेल्या सिगारेटचं थोटकं ते खाली ठेवायचे... साहिरच्या प्रेमात आत्कंठ बुडालेली अमृता तेच अर्धवट जळालेलं सिगारेटचं थोटकं पुन्हा पेटवायची आणि ओढायची... ती सिगारेट बोटात धरल्यानंतर मला साहिरजींच्या हातांना स्पर्श केल्याची भावना येते, असं ती म्हणायची... 'रसीदी टिकट' या आत्मचरित्रात तिने साहिरजींबरोबरचे अनेक प्रसंग लिहिलेत. पण असं जरी असलं तरी साहिरजींनी आपलं प्रेम कधीही लपवलं नाही. पुढे हीच नात्यांची गुंतागुंत लिहिताना साहिरजी म्हणतात, 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा...!'


त्यांची दुसरी अधुरी प्रेमकहाणी म्हणजे बॉलिवूडच्या पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा यांच्यासोबतच्या... परंतु बऱ्याच जणांना वाटतं की साहिरचं सुधावर एकतर्फी प्रेम होतं. सुधा यांचा आवाज काळजाला भिडणारा होता. याच आवाजावर साहिरजींचं मन जडलं. पण 1961 साली सुधा यांनी लग्न केलं आणि सुखी संसाराला सुरुवात केली. लग्नानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्याचं सोडलं. पण साहिरजींनी सुधावर प्रेम करण्याचं मात्र सोडलं नव्हतं. पुढे साहिरजींनी सुधासाठी एक खास गाणंही लिहिल्याची चर्चा झाली जे गाणं महेंद्रने गायलं, या गीताचे बोल होते...


'चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों 
न मैं तुम से कोई उम्मीद रखूँ दिल-नवाज़ी की 
न तुम मेरी तरफ़ देखो ग़लत-अंदाज़ नज़रों से 
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों से 
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज़ नज़रों से' 


लग्न झाल्यानंतर सुधा यांनी एकही गाणं गायलं नाही. पण लग्नाअगोदर साहिरजींनी लिहिलेलं एक गाणं सुधाने गायलं होतं, ज्या गाण्यातून दोघांचंही नातं अधोरेकित होतं... ते गीत आहे- 'तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको.. मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है'!


"ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतोंपर धर्मकी मोहरे है, हर युगमे बदलते धर्मोको कैसे आदर्श बनाओगे", हे शब्द लिहिण्याची साहिरजींनी ताकद ठेवली. आजूबाजूला दाटून आलेलं असतानाही आजच्या काळात भूमिका न घेणाऱ्या कलाकारांनी कधीतरी साहिरजींना आठवावं आणि आपल्या कलाकारीतून निर्भीड भाष्य करावं, बरं सगळ्याच कलाकारांकडून नाही पर 'जिन्हे साहिर पर नाज हैं'  त्यांच्याकडून तरी किमान...!