Usha Mangeshkar : पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज जन्मदिन आहे. त्या आज त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहीण असलेल्या उषा मंगेशकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला. 


अलौकिक संगीत प्रवास!


उषा मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी', 'एक लाजरा न् साजरा', 'काय बाई सांगू', 'गोड गोजिरी लाल लाजरी', 'शालू हिरवा', अशी अनेक गीते त्यांनी आपल्या मधुर आवाजाने अजरामर केली आहेत. भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंत सर्वच प्रकारांत त्यांनी गाणी गायली आहेत. 


'या' गाण्यामुळे मिळाली ओळख


उषा मंगेशकर यांनी पार्श्वगायिका म्हणून संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1955 साली आलेल्या 'आजाद' (Azad) सिनेमातील 'अपलम चपलम' (Aplam Chaplam) या गाण्याने उषा मंगेशकर यांना खरी ओळख मिळाली. आजही हे गाणं लोकप्रिय आहे. त्यानंतर 1975 साली आलेल्या 'जय संतोषी मां' (Jai Santoshi Maa) या सिनेमातील 'मैं तो आरती उतारो रे' (Main To Aarti Utaru Re) हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी (Filmfare Awards) नामांकन करण्यात आले. 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar), आशा भोसले (Asha Bhosle) आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांच्या तुलनेत उषा मंगेशकर यांना कमी प्रसिद्धी मिळाली आहे. पण तरीही प्रसिद्धीचा लोभ न करता त्या कायम संगीतसाधना करत राहिल्या आहेत. उषा मंगेशकरांनी सिनेमांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला आहे.


शेकडो सुमधुर गाणी गाणाऱ्या उषा मंगेशकर!


'सुबह का तारा', 'जय संतोषी मां', 'आझाज', चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इनकार अशा अनेक हिंदी सिनेमांतील गाणी उषा मंगेशकर यांनी गायली आहेत. दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या सिनेमांसाठी त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांना रसिकांची विशेष दाद मिळाली आहे. 


चित्रकलेची आवड असलेल्या उषा मंगेशकर!


उषा मंगेशकर यांना संगीतासोबत चित्रकलेचीदेखील आवड आहे. एखाद्या व्यक्तीला समोर बसवून त्याचं चित्र काढायला त्यांना आवडतं. मास्टर दीनानाथ मंगेशकर व लता दीदी यांची त्यांनी काढलेली चित्रे अतिशय भावपूर्वक व जिवंत वाटतात. 


संबंधित बातम्या


15 December In History: देशाला एकसंघ करणारे लोहपुरुष 'सरदार वल्लभभाई पटेल' यांची पुण्यतिथी, सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित, आज इतिहासात