संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी आणि सहकाऱ्यांनी हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 'सेन्सर बोर्ड' यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती. तसेच आक्षेपार्ह प्रसंगांबाबत वकिलांमार्फत नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडच्या या पाठपुराव्यास यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. चित्रपटातील सर्व वादग्रस्त प्रसंग वगळण्याचं ZEE स्टुडिओ आणि हर हर महादेव चित्रपटातील टीमने मान्य केलं आहे. याबाबतचं पत्रही संभाजी ब्रिगेडला झी कडून देण्यात आलं आहे.
वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता. या विरोधात संभाजी ब्रिगेड ने पुण्यातील चित्रपटगृह बंद पाडली होती. तसेच आक्रमक भूमिका सुद्धा घेतली होती.
ZEE स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात 14 डिसेंबर 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि सहकार्याने याबाबत भूमिका घेतली होती. म्हणूनच झी स्टुडिओ आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत समर्थन देऊन वादग्रस्त प्रसंग वगळण्याचा निर्णय घेतला.
हर हर महादेव हा चित्रपट झी मराठीने टिव्हीवर प्रदर्शित केला तर... - स्वराज्य
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनी 18 डिसेंबर रोजी टिव्हीवर प्रदर्शित करणार आहे. यास छत्रपती संभाजीराजे यांनी पत्र लिहून विरोध केला होता. या पत्रास झी मराठी कडून कोणतेही उत्तर आले नाही. शिवाय, चित्रपट प्रदर्शनाची जाहिरात झी मराठी वाहिनीवर सुरूच असल्याने 13 डिसेंबर रोजी स्वराज्यचे पदाधिकारी अंकुश कदम व विनोद साबळे यांनी झी स्टुडीओमध्ये प्रत्यक्ष जाऊन चित्रपट प्रदर्शित करू नये, याबाबत झी व्यवस्थापनास संविधानिक मार्गाने इशारा दिला आहे. यानंतर, झी मराठीने चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे माध्यमांतून समजते आहे. ज्याअर्थी त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, त्याअर्थी या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दर्शविल्याचे व वादग्रस्त सादरीकरण केल्याचे एकप्रकारे मान्यच केलेले आहे. तथापि, संपूर्ण चित्रपटाच्या सादरीकरणावरच आमचा आक्षेप असून, तसेच नेमका कोणता भाग वगळणार याची स्पष्टता नाही, त्यामुळं स्वराज्य संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत झी मराठी वाहिनीने हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम झी वाहिनीला भोगावे लागतील. हर हर महादेव हा चित्रपट टिव्हीवर दाखवने महाराष्ट्रातील शिवप्रेमी व स्वराज्य संघटना सहन करणार नाही, असं स्वराज्य संघटनेनं सांगितलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; संभाजीराजेंचा इशारा