Uday Mahurkar On Oppenheimer Movie : 'ओपनहाइमर' (Oppenheimer) या हॉलिवूड सिनेमाची सध्या देशभरात चर्चा आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत असताना दुसरीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर (Uday Mahurkar) यांनी ट्वीट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे.  


उदय माहूरकर यांनी ट्वीट करत 'ओपनहाइमर' या सिनेमाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनला (Christopher Nolan) पत्र लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"सेव्ह कल्टरल सेव्ह इंडिया फाऊंडेशनकडून नमस्कार. 'ओपनहाइमर' या सिनेमात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, असं एक दृश्य आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचतानाचं एक दृश्य सिनेमात आहे. 'भगवद्गीता' हा हिंदू धर्मातील प्रवित्र ग्रंथांपैकी एक आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचणं म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केल्यासारखं आहे". 


उदय माहूरकर यांनी पुढे लिहिलं आहे,"आपण कोणत्या जगात जगत आहोत. एजन्सी, मीडिया, राजकारण आणि तुमची हॉलिवूड इंडस्ट्री ही कुराण आणि इस्लामसंदर्भातील कोणत्या गोष्टीचं चित्रण ते दुखावले जातील अशा पद्धतीचं करत नाहीत. मग हिंदू धर्माच्या बाबतीत ही गोष्ट का लागू होत नाही. तुमच्या सिने-निर्मितीचं भारतात खूप कौतुक होत आहे. आमचा विश्वास आहे की, तुम्ही जर सिनेमातील हे वादग्रस्त दृश्य काढून टाकलं तर एक संवेदनशील माणूस म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अब्जावधी हिंदूंच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. याकडे तुम्ही दुलर्क्ष केले तर आवश्यक ती कारवाई करावी लागले". 






'ओपनहाइमर' या सिनेमात इंटिमेट सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन होत असल्याचं पाहून नेटकरीदेखील भडकले आहेत. या सीनबद्दल सोशल मीडियावर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. सिनेमातील हे दृश्य कायम ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवरही  (CBFC) टीका होत आहे. 


'ओपेनहायमर' हा हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी  सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. भारतात या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


संबंधित बातम्या


Oppenheimer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'ओपनहायमर'चा धमाका; दोन दिवसांत केली 30 कोटींपेक्षा अधिक कमाई