मुंबई: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता त्याला आणखी एक धमकीचा मेल आल्याची बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर 18 मार्च रोजी हा मेल आला आहे. मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा कर, नाहीतर पुढच्या वेळी झटका दिला जाईल असं त्या मेलमध्ये म्हटलं आहे. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल आला असून त्यामध्ये गँगस्टर गोल्डी ब्रारचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 


धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानच्या टीमने या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  हा ई-मेल एका टोळीकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


काय म्हटलंय या ई-मेलमध्ये?


गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमच्या बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा, मी पाहून घेईन. प्रकरण बंद करायचं असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार. 


लॉरेन्स बिश्नोई काय म्हणाला होता? 


एबीपीच्या मुलाखतीत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता की, "सलमानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली होती. त्यामुळे त्याने आता आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा आणि माझा काहीही संबंध नाही. त्याने माफी मागितली तर ठीक नाहीतर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. सलमानला मी धमकी देत नसून विनंती करत आहे. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील दिले आहेत. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत." 


काय आहे प्रकरण? 


काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलिसांना आहे.


बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. 


ही बातमी वाचा: