Pran Death Anniversary : अभिनेते प्राण (Pran) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक होते. आज (12 जुलै) प्राण यांचा स्मृतिदिन आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या खलनायकाने बॉलिवूड विश्व गाजवले होते. प्राण हे असे खलनायक होते, जे चित्रपटातील नायकापेक्षा अधिक मानधन घेत होते. प्राण यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक ‘खानदान’ या चित्रपटातून मिळाला होता. मात्र, भारत-पाक फाळणीपूर्वी त्यांनी ‘यमला जट’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. प्राण अभिनय करताना त्यात इतके तल्लीन होत की, ते पात्र पडद्यावर अक्षरशः जिवंत वाटायचे.


प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत झाला होता. फोटोग्राफीची आवड असलेल्या प्राण यांनी फाळणीपूर्वी काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. लाहोरमध्येही त्यांनी 1942 ते 1946 या काळात तब्बल 22 चित्रपटांमध्ये काम केले. फाळणीनंतर ते पत्नी आणि मुलासह पाकिस्तानातून भारतात येऊन स्थायिक झाले. प्राण यांना बालपणापासून फोटोग्राफीची आवड होती. त्यांनी दिल्लीच्या 'ए दास अँड कंपनी'मध्ये इंटर्न म्हणूनही काम केले होते. पण फोटोग्राफी करत असताना त्यांना मनोरंजन विश्व खुणावत होते.


असा मिळाला पहिला चित्रपट!


एके दिवशी लेखक मोहम्मद वली यांनी प्राण यांना पान टपरीवर उभे असलेले पाहिले. याच क्षणी त्यांनी प्राण यांना आपल्या ‘यमला जट’ चित्रपटात घेण्याचे ठरवले होते. त्यांनी विचारणा केली असता, प्राण यांनीही या चित्रपटासाठी होकार दिला आणि येथूनच त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला. हा तो काळ होता, जेव्हा भारत आणि पाक फाळणी झाली नव्हती. त्यांचा पहिला चित्रपट ‘यमला जट’ 1940मध्ये प्रदर्शित झाला होता.


आकारायचे नायकापेक्षाही जास्त मानधन!


त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक इतका गाजायचा की, प्रेक्षकही वाहवा करायचे. यामुळेच ते चित्रपटांमधील नायकापेक्षा जास्त फी घेत, असे असेही बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी डॉन चित्रपटासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, तर प्राण यांनी तब्बल पाच लाख रुपये घेतले होते. निर्माते देखील त्यांना मागतील तितके मानधन द्यायचे. त्यांनी 'मधुमती', 'देवदास', 'दिल दिया दर्द लिया', 'डॉन', 'जंजीर', 'मुनीम जी', 'अमरदीप', 'मजबूर', 'दोस्ताना', 'नसीब', 'अमरदीप', ‘कालिया', 'अमर अकबर अँथनी'  या चित्रपटांत साकारलेली पात्र प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती.


‘खलनायका’ची प्रतिमा पुसण्याचा निर्णय


प्राण यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक इतका जिवंत वाटायचा की, त्या लोक त्यांच्या पात्रांचा तिरस्कार देखील करायचे. इतकंच नाही तर, लोकांनी आपल्या नवजात बाळांना ‘प्राण’ हे नाव देण्याचा विचार देखील मनातून काढून टाकला होता. मात्र, यानंतर त्यांनी आपल्यातील ‘खलनायक मागे सोडण्याचा निर्णय घेतला. 1967मध्ये प्रदर्शित झालेल्या मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ या चित्रपटात त्यांनी ‘मंगल चाचा’ ही भूमिका साकारली होती. प्राण यांनी साकारलेले ‘मंगल चाचा’ प्रेक्षकांमध्ये इतके लोकप्रिय झाले की, यामुळे त्यांची खलनायिकी प्रतिमा मागे पडू लागली. यानंतर त्यांनी चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. ‘शहीद’, ‘पूरब और पश्चिम’, ‘संन्यासी’, दस नंबरी’, ‘पत्थर के सनम’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांची खलनायकाची प्रतिमा मागे सोडण्यात त्यांना मदत केली.


अमिताभ बच्चन अभिनित ‘जंजीर’ या चित्रपटात त्यांनी ‘शेरखान’ हे पात्र साकारले होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. ‘मंगल चाचा’ आणि ‘शेरखान’ या भूमिकांनी मनोरंजन विश्वात त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. ‘हाफ तिकीट’ या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार यांच्यासोबत कॉमेडी देखील केली.


मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव!


अभिनेते प्राण यांनी त्यांचे प्रत्येक पात्र मोठ्या पडद्यावर जिवंत केले होते. कधी कधी तर, त्यांनी साकारलेली भूमिका चित्रपटाच्या मुख्य नायकापेक्षाही अधिक भाव खाऊन जायची. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, चित्रपटाच्या क्रेडिट यादीत ‘...आणि प्राण’ असे लिहिले जायचे. प्राण यांच्या बायोग्राफिचे नाव देखील ‘...अँड प्राण’ असे ठेवण्यात आले. 1988मध्ये हृदय विकाराच्या झटक्यानंतर त्यांनी चित्रपटांत काम करणे कमी केले. यानंतर आजारपणामुळे ते व्हीलचेअरवरच होते. तरीही त्यांनी काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. मनोरंजन विश्वात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याने अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते.


1967मध्ये ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. 1997मध्ये त्यांना फिल्मफेयरच्या ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट सृष्टीतील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना 2001मध्ये ‘पद्म भूषण’, तर, 2012मध्ये ‘दादासाहेब फाळके’ या भारतातील मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तब्बल 400हून अधिक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते प्राण यांचे 2013मध्ये वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 12 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या