The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून  ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट उद्या (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा पॅन इंडिया चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहे.‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील काही सिन्स हटवण्यात देखील आले आहेत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डनं 'ए' सर्टिफिकेट दिलं आहे.  या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सध्या केली जात आहे. हे प्रकरण कोर्टात देखील पोहोचलं आहे.  ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट का जारी करण्यात आला आहे? ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदीची मागणी का केली जात? या सर्व गोष्टींबाबत जाणून घेऊयात...


द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याआधी तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट  जारी



द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याआधी तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वेब साइटला एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, 'काही गटांनी चित्रपटाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील मेसेजची आमच्या इंटेलिजेंस विंगने दखल घेतली आहे. काही इस्लामिक गटांनी  या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र सरकारनं चित्रपटावर बंदी घातली नाही. सगळ्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.'



चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी



काही लोकांनी द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत कोर्टात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, हा चित्रपट संपूर्ण समाजाला अपमानित करतो. सुप्रीम कोर्टाने बुधवारी 'द केरळ स्टोरी'चे रिलीज थांबवण्याच्या याचिकांवर विचार करण्यास नकार दिला होता आणि याचिकाकर्त्यांना केरळ उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. 
 


सेन्सॉर बोर्डने दिल्या होत्या 'या' सूचना


 सेन्सॉर बोर्डने 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील 10 सीन्स काढून टाकण्यास सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटातील "भारतीय कम्युनिस्ट सबसे बडे पाखंडी है' या डायलॉगमधील 'भारतीय' हा शब्द काढून टाकण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. तसेच या सिनेमाला ए सर्टिफिकेटदेखील दिलं आहे. तसेच चित्रपटाच्या टीझरमध्येही बदल करण्यात आला होता.  32000 मुलींच्या ऐवजी नव्या टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 महिलांचा ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करुन त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते, असं म्हटलं आहे. 


चित्रपट उद्या होणार रिलीज


वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट उद्या (5 मे) रिलीज होत आहे. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :