मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. चित्रपटात कोणत्या राजकीय व्यक्तीची भूमिका कोणता कलाकार साकारणार, हे हळूहळू उलगडत आहे. आता या सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टचा फोटो समोर आला आहे.


चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. फोटोमध्ये मनमोहन सिंग, त्यांची पत्न गुरशरण कौर, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलच्या सेटवर हा फोटो काढल्याचं दिसत आहे.


'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा सिनेमा 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय गुट्टे यांचं दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत अक्षय खन्ना, सुझेन बर्नार्ट, आहना कुमरा, अर्जुन माथुर मुख्य भूमिकेत आहेत. संजय बारु यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील त्यांची दाढी, डोक्यावर पगडी आणि देहबोली हुबेहूब मनमोहन सिंह यांच्यासारखीच असल्याचं म्हटलं जातं.