लंडन : जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला स्थान मिळालं आहे. दीपिकाचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बनवण्यात येणार आहे. भारतासह जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे मादाम तुसाँमध्ये बनवण्यात आले असून आता दीपिकाचाही त्यामध्ये समावेश होणार आहे.
खुद्द दीपिकानेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 2019 पर्यंत दीपिकाच मेणाचा पुतळा लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. तर दिल्लीतील संग्रहालयातही काही महिन्यांनंतर दीपिकाचा मेणाचा पुतळा तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.
मादाम तुसाँमधील कलाकारांनी दीपिकाची लंडनमध्ये पुतळ्यासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी पुतळा बनवण्यासाठी तिचे माप देखील घेण्यात आले. पुतळ्यासाठी दीपिकाचे विविध प्रकारे 200 वेळा माप घेण्यात आलं, तसेच दीपिकाचे अनेक फोटोही घेण्यात आले.
मादाम तुसाँमध्ये स्थान मिळाल्याने दीपिका खुप आनंदी आहे. यावेळी दीपिकाने म्हटलं की, 'मादास तुसाँच्या एक्सपर्ट टीमला भेटण्याचा अनुभव चांगला होता.' मादाम तुसाँ म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, करिना कपूर, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे पुतळे आहेत.
दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. पहिल्याचा चित्रपटात तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडली. सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचा समावेश आहे.