मुंबई : 'सैराट'मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरु लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'कागर' नावाच्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी तिच्या नृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे.


'कागर' सिनेमाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सिनेमातील गाण्याच्या मेकिंगचा हा व्हिडीओ असून त्यात रिंकूच्या डान्ससोबत धम्माल, मज्जा मस्तीही पाहायला मिळत आहे.

'सैराट' सिनेमाला दोन वर्ष झाली. मात्र या सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली रिंकू जणू गायबच होती. पण आता 'कागर' सिनेमातील व्हिडीओच्या माध्यमातून ती मोठ्या काळानंतर प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यामुळे व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.



या डान्ससोबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रिंकूचा बदललेला लूक. सिनेमासाठी रिंकूने वजन कमी केल्याचं दिसतं. या व्हिडीओत ती पूर्वीपेक्षा बारीक दिसत आहे.

दरम्यान, मकरंद माने हे 'कागर' चित्रपटाचे दिग्दर्शक असून सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. मात्र सिनेमातील रिंकूच्या नायकाचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे.