मुंबई : हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजेच जगप्रसिद्ध 'ब्लॅक पँथर'चं आज (29 ऑगस्ट) निधन झालं. चॅडविक हा गेल्या चार वर्षापासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होतं.


मार्वेल स्टुडिओ फिल्मचा हा एक लाडका अभिनेता होता. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत, त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.


"चॅडविक हा एक खरा फायटर होता, तो आपलं काम सांभाळत या आजाराशी चार वर्ष लढल, मार्शल चित्रपटापासून ते 'डा 5' या चित्रपटापर्यंत, मा रॅनीज् ब्लॅक बॉटम आणि बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले आणि 'ब्लॅक पँथर' या चित्रपटातील किंग टी'चला (King T'Challa) या पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीरवर नेऊन ठेवलं", असं त्याच्या कुटुंबाने म्हटलं.







मार्वेल स्टुडिओच्या ब्लॅक पँथरमध्ये सुपरहिरोची मुख्य भूमिका निभावल्यानंतर त्याने हॉलिवूडमध्ये खूप मोठं नाव कमावलं, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर आणि दिग्दर्शक रायन कूग्लर यांच्या 2018 सालच्या फिल्मची जगभरातील कमाई तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली. अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर आणि अॅव्हेंजर्स : एण्डगेम या दोन चित्रपटातही त्याने ब्लॅक पँथरचं पात्र निभावलं. 2020 च्या सुरुवातीला स्पाईक ली'ज डा 5 ब्लड्स या फिल्मसाठी शूटिंग केलं, ही फिल्म 2021 साली नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही फिल्म त्याची शेवटची आठवण असणार आहे.


चॅडविकचा जन्म आणि त्याचं शिक्षण दक्षिण कॅरोलिना, अमेरिका इथे झालं. त्याला टेलिव्हिजन क्षेत्रात, थर्ड वॉच नावाच्या मालिकेत पहिला रोल हा 2003 साली मिळाला होता. 2013 साली आलेल्या स्पोर्ट्स ड्रामा 42 मध्ये त्याला पहिली भूमिका मिळाली. त्याने ब्लॅक आयकन, थर्गुड मार्शेल, अशा बायोपिकही केल्या आणि मार्वेलच्या ब्लॅक पँथर या पात्रासाठी त्याचं मार्वेलसोबत कॉन्ट्रॅक्ट कायम होतं.



Wakanda Forever वाकांडा फॉरेव्हर हा त्याचा डायलॉग आणि त्याची फेमस पोझ अजूनही GIF किंवा मिम्सच्या स्वरुपात आपण पाहतोच, ही पोझसुद्धा त्याची आठवण म्हणून हॉलिवूडकडे राहणार आहे. ट्विटरवर जगभरातील चाहत्यांकडून त्याची आठवण म्हणून #WakandaForever #RIPLegend #ChadwickBoseman हे काही हॅशटॅग्स वापरत ट्वीट केले आहेत.


2020 या वर्षात बॉलिवूड असो किंवा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हॉलिवूडमधलेही अनेक कलाकार गमावले आहेत. या कलाकारांसाठी फॅन्सकडून मिळणारं प्रेम अजूनही तसंच आहे आणि हे कलाकार आपल्यात नसले तरी त्यांच्या गाजलेल्या भूमिका कायम सर्वांच्या मनात राहतीलच.