नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असं एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला आपला अहवाल सोपावत म्हटलं आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली. सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे वकील सुशांतची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा करत होते. मात्र एम्सच्या पॅनलने सुशांतचे कुटुंबिय आणि त्याच्या वकीलांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय आणि वकील सतत सुशांतला विष देण्यात आलं होतं आणि गळा दाबून मारण्यात आलं होतं, असं म्हणत होते. एम्सच्या डॉक्टरांनी सोपावलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलणार आहे.


34 वर्षीय बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून रोजी आपल्या मुंबईतील राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. परंतु, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमा आणि सुशांतच्या कुटुंबियांचे दावे यांमुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्यात आलं होतं.


डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या पॅनलने आपला तपास पूर्ण केला आहे आणि सीबीआयला आपला अहवाल सोपावल्यानंतर आपली फाइल बंद केली आहे. आता सीबीआय एम्सने दिलेल्या अहवालासोबत आपल्या तपासातून समोर आलेल्या बाबी पडताळून पाहत आहे. तसेच एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलणार आहे. सीबीआय अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं समोर ठेवून पुढिल तपास करू शकते. मुंबई पोलिसांनीही सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं समोर ठेवूनच तपसा करण्यास सुरुवात केली होती. परंतु, याप्रकरणी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.


डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, सुशांतचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या रुग्णालयाच्या अहवालावर एम्स पॅनलने आपली सहमती दर्शवली आहे. मुंबईतील रूग्णालयाने सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण 'गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून' झाला असल्याचं सांगितलं होतं.


दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं सीबीआयच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :