चंदीगड : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला, तिचा पती अक्षय ठक्कर आणि भाऊ मनविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 40 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पंजाबमधील व्यावसायिक सत्यपाल गुप्ता आणि त्यांचा मुलगा पंकजा गुप्ताने पोलिसात ही तक्रार दिली होती.

सुरवीन चावला, तिचा पती आणि भावाने गुप्ता यांच्याकडून सिनेमासाठी 40 लाख रुपये घेतले आणि हा पैसा दुप्पट करुन देण्याचं आश्वासन दिलं. मात्र आजपर्यंत एक रुपयाही परत मिळालेली नाही, अशी तक्रार गुप्ता या बाप-लेकांनी पोलिसात दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पंकजा गुप्ता यांची सुरवीनच्या भावासोबत ओळख होती. याचमुळे ते नील बट्टे सन्नाटा या सिनेमाला पैसा लावण्यासाठी तयार झाले. 50 लाख रुपये गुंतवण्याचं ठरलं होतं, मात्र काही तांत्रिक कारणास्तव केवळ 40 लाख रुपयेच ट्रान्सफर झाले. यासाठी सुरवीन पंकजा गुप्ता यांना तीन वेळा भेटली होती.

सुरवीनने गुप्ता बाप-लेकांना आश्वासन दिलं, की सिनेमा रिलीज झाल्यानंतर सहा महिन्यात 70 लाख रुपये परत करेन. सिनेमा रिलीज झाला, चांगला व्यवसायही केला. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर गुप्ता बाप-लेक सुरवीनशी मेलवर संपर्क साधत होते. मात्र त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असं तक्रारीत म्हटलं आहे.

यानंतर गुप्ता यांनी अकाऊंट स्टेटमेंट मिळवलं, ज्यात समोर आलं की 40 लाख रुपये अक्षय ठक्करने दुसरीकडे खर्च केले आहेत. यानंतर सुरवीनने गुप्ता यांना कोणताही रिप्लाय दिला नाही आणि फोन घेणंही बंद केलं, असा आरोपही करण्यात आला आहे.