मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे चित्रपट शंभरच नाही, तर दोनशे-तीनशे कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करतात. अलिकडेच प्रदर्शित झालेला 'टायगर जिंदा है' हे त्याचं ताजं उदाहरण. मात्र आता तर रिलीज होण्यापूर्वीच सलमान खानच्या सिनेमाने जवळपास दोनशे कोटी रुपयांची कमाई केली आहे.


सलमानचा आगामी चित्रपट 'रेस 3'ने प्रदर्शनापूर्वीच 190 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. इरॉस इंटरनॅशनल कंपनीने सहनिर्माता सलमान खान आणि निर्माते रमेश तौरानी यांना ऑफर दिली.

चित्रपटाचे जागतिक वितरण हक्क (चीन वगळता) आणि गॅरंटी रक्कम म्हणून 160 कोटी रुपये इरॉसने मोजल्याची माहिती आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, रिलायन्स एन्टरटेनमेंट, यश राज फिल्म्स आणि इरॉस इंटरनॅशल कंपनीमध्ये 'रेस 3' चे हक्क विकत घेण्यासाठी चढाओढ सुरु होती.

सलमानच्या 'टायगर जिंदा है'ने बॉक्स ऑफिसवर 339 कोटी रुपये कमावले होते. रेस 3 सुद्धा 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जूनला रेस 3 प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह, साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवाला मुख्य भूमिकेत आहेत.