Hamare Baarah Movie :  अन्नू कपूरच्या (Aannu Kapoor) 'हमारे बारह' (Hamare Baarah) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होणार होता. इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान केल्याच्या आरोपांवर कारवाई करत न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.


न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता व्हेकेशन बेंचच्या समोर ही सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्ते अझहर बाशा तांबोळी यांच्या वकिल फौजिया शकील यांचा युक्तिवाद विचारात घेण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाला या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितलं आहे. 


'ट्रेलरमध्ये सर्व आक्षेपार्ह संवाद अजूनही आहेत'


चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देताना खंडपीठाने सांगितले की, 'आम्ही सकाळी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि ट्रेलरमध्ये सर्व आक्षेपार्ह संवाद अजूनही आहेत.' मुंबई उच्च न्यायालय याचिका निकाली काढेपर्यंत खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. 


प्रकरणात समिती निवडण्याचा दोन्ही पक्षांना पर्याय


याचिकाकर्त्यांचे वकील फौजिया शकील म्हणाल्या, 'उच्च न्यायालय सेन्सॉर बोर्डाला समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ शकत नाही कारण CBFC स्वतः या खटल्यात पक्षकार आहे.' सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,  या प्रकरणातील दोन्ही पक्षांसाठी सर्व आक्षेप उच्च न्यायालयासमोर ठेवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, ज्यात CBFC ला समिती निवडण्याचे निर्देश देण्यावर आक्षेप आहे.


 14 जूनला चित्रपट होणार होता प्रदर्शित


हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र, कर्नाटकात यापूर्वीच त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान करत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे आणि जर चित्रपट प्रदर्शित झाला तर ते कलम 19(2) आणि घटनेच्या अनुच्छेद 25 चे उल्लंघन होईल.


हायकोर्टाकडून देण्यात आले होते निर्देश


मुंबई हायकोर्टाने या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती दिली होती. हायकोर्टात झालेल्या सुनावणीत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवून सर्व शोमध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  संपूर्ण देशभरात आक्षेपार्ह संवाद वगळूनच चित्रपट प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले.                                



ही बातमी वाचा : 


Marathi Serial Update : 'संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती'; आई कुठे... च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले