The Kerala Story:  पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'  (The Kerala Story) चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने 'द केरळ स्टोरी' चित्रपट वर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने घातलेली बंदी उठवली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात एक डिस्क्लेमर टाकायला सांगितले आहे. ज्यामध्ये, "32000 मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण झाल्याचा कुठलाही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. एका विषयाचे हे काल्पनिक रूप आहे. " असं लिहिलेलं असावं.


तामिळनाडूमधील चित्रपटावरील कथित 'शॅडो बॅन' बद्दल देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.  तामिळनाडूमध्ये, प्रत्येक सिनेमा हॉलसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली जावी आणि ज्यांना चित्रपट पाहायचा आहे त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असं कोर्टानं सांगितलं. 


काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. 






"द काश्मीर फाइल्स" म्हणजे काय? हा चित्रपट लोकांच्या एका सेक्शनचा अपमान करतो. "द केरळ स्टोरी" म्हणजे काय? तर ही विकृत कथा आहे", असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान विपुलने म्हटले  होते की,'बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू'


'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. तर काही जण या चित्रपटावर टीका करत आहेत.मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


The Kerala Story BO Day 13: 'द केरळ स्टोरी' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 13 दिवसात केली एवढी कमाई