नवी दिल्ली : संजय लीला भन्साली दिग्दर्शिक पद्मावती चित्रपटाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.


"सेन्सॉर बोर्डाने अद्याप या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही थेट या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नाही," असं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं.

सिद्धराज सिंह चूडास्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. सिनेमात पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांचं चरित्र ज्या प्रकारे दाखवलं आहे, त्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सुरुवातीपासून या सिनेमाला विरोध होत आहे. त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी आपली बाजू मांडली आहे. भन्साली यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ मेसेज जारी करुन स्पष्ट केलं आहे की, "सिनेमात दीपिका म्हणजेच पद्मावती आणि रणवीर म्हणजेच अलाउद्दीन खिलजी यांच्यात कोणताही ड्रीम सिक्वेंस नाही. इतकंच नाही तर दोन्ही कलाकारांनी 'पद्मावती'चं चित्रीकरण एकत्र केलं नाही."