मुंबई : 'सैराट' फेम आर्ची अर्थात अभिनेत्री राजगुरु धबधब्यावर शूटिंग करताना पडली, अशा कॅप्शनसह एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूच्या वडिलांनी मात्र ती अभिनेत्री आपली मुलगी नसल्याचा दावा केला आहे.


धबधब्याजवळ निसरड्या दगडांवर शूटिंग सुरु असताना एक तरुणी पडल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. डान्स करत असताना संबंधित तरुणी पडून दगडांवर जोरदार आपटली, मात्र तिला फारशी दुखापत झालेली नसावी. चित्रीकरण स्थळी उपस्थित असलेले क्रू तात्काळ तिच्या मदतीसाठी धावले.

व्हिडिओत पडलेली अभिनेत्री ही रिंकू राजगुरु असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा व्हिडिओ तिच्या 'मनसु मल्लिगे' या कन्नड सिनेमाचा असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

दरम्यान, व्हिडिओत दिसणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु नसल्याचा दावा रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांनी 'माझा'शी बोलताना केला आहे.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरु चित्रपटात पदार्पण केलं. एकाच चित्रपटातून तिला अमाप लोकप्रियता तर मिळालीच, परंतु तिने राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरलं.

रिंकूचे आई-वडीलही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. एक मराठा लाख मराठा चित्रपटातून ते मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत आहेत.

पाहा व्हिडिओ :