Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. 22 वर्ष प्रेक्षक प्रतीक्षा करत असेला हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. आता या सिनेमासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'गदर 2' हा सिनेमा पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
'गदर 2' या सिनेमाचे देशभरातील विविध सिनेमागृहात शो आयोजित करण्यात आले आहेत. सनी देओल आणि 'गदर'चे चाहते हा सिनेमा पाहायला जात असून थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशातील (UP) लखीमपुरातील खीरी भागात 'गदर 2' या सिनेमाच्या शोदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. सिनेमा पाहायला गेलेल्या एका तरुणाचा थिएटरमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तरप्रदेशात राहणारा अक्षत तिवारी नामक 32 वर्षीय एक तरुण 'गदर 2' हा सिनेमा पाहायला लखीमपुरातील खीरी येथील एका सिनेमागृहात गेला होता. शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता लखीमपुरातील 'फन' सिनेमामृहात तो गेलेला. दरम्यान त्याला कोणाचातरी फोन आला आणि फोनवर बोलत असताना तो सिनेमागृहाच्या गेटवर गेला आणि त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे फोनवर बोलतानाच तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर सिनेमागृहात उपस्थित असलेल्या मंडळींनी त्याला लगेचच रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, अक्षत जमीनीवर कोसळल्यानंतर सिनेमागृहातील दोन मंडळी त्याच्याजवळ येतात ते आणखी लोकांना बोलवतात. काही लोक त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारतात पण त्यानंतरही तो शुद्धिवर येत नाही.
पोलीस अधिकारी नैपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,"सिनेमागृहात सिनेमा पाहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानेच तरुणाचा मृत्यू झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर तारा सिंहची हवा!
सनी देओल (Sunny Deol), अमीषा पटेल (Ameesha Patel) अभिनीत 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत 456.95 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 572.2 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या