Sukanya Mone : "हल्लीच्या मुलांना लग्नानंतर अपत्य नको असतं, आई वडिलांनी आता सावध राहिलं पाहिजे, असं वक्तव्य मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनी केलं आहे. सुकन्या मोने यांचा 'जन्म ऋण'(Janma Runna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्या या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमानिमित्ताने 'सिनेमागल्ली'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
सुकन्या मोने यांचा 'जन्म ऋण' हा सिनेमा सत्य परिस्थितीवर आधारित आहे. आजकाल आई-वडिलांना सोडून मुलं परदेशात जातात. मुलं विमानतळावर सोडून परदेशात गेल्यामुळे पालकांची दुर्दशा होते. अशावेळी पालकांची दुर्दशा की मुलांचं खडतर करिअर? असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी आई-वडिलांनीदेखील स्वत:ला बळकट करणं गरजेचं आहे हे सांगणारा 'जन्म ऋण' हा चित्रपट आहे.
सुकन्या मोनेंनी 'जन्म ऋण' सिनेमा का केला?
'सिनेमागल्ली'ला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोने म्हणाल्या,"जन्म ऋण' सिनेमाची गोष्ट मी वाचली होती. या सिनेमाची गोष्ट आपण सर्वांनीच वर्तमानपत्रामध्ये वाचलेली असेल आणि माझ्या आसपास काही लोक मी पाहत होते त्यांची मुलं परदेशात आहेत. आमच्याकडे गणेशोत्सवामध्ये विसर्जनाला सोसायटीत पूर्वी 52 गणपती असायचे आता ते सहावर आले आहेत. कारण अनेकांची मुलं परदेशात असल्याने ते चांदीची गणपती आणतात. किंवा घरातच बादलीमध्ये विसर्जन करतात. मुलांना जरी गणेशोत्सव साजरा करायला भारतात यायचं असलं तरी तेवढ्यासाठी इथे येणं परवडणारं नसतं. परदेशात गेलेल्या मुलांचे आई-वडील एकटे पडायचे. मग आम्ही सोसायटीतले काही जणं त्यांची विचारपूस करायचो. संवाद हा मानसिक रोगावरचा उत्तम उपाय आहे".
आई-वडिलांनी आता सावध राहिलं पाहिजे : सुकन्या मोने
सुकन्या मोने म्हणाल्या," आजकालच्या मुलांचं करिअर उत्तम होतं. चांगले पैसे कमावतात. पण ही आजकालची मुलं लग्नानंतर मुलबाळ नको असा निर्णय घेतात. त्यामुळे नातवंडाची ओढ काय असते हेदेखील पालकांना अनुभवता येत नाही. त्यामुळे घरातील कामवाली, स्वयंपाक करणारी बाई, इस्त्रीवाला, दुधवाला,भाजीवाला, पेपरवाला यांच्यासोबत ते संवाद साधतात. अशाप्रकारे ही मंडळी त्यांचा त्यांचा आनंद शोधतात. जगण्याचं कारण शोधत असतात. मला या सिनेमात कुठेतरी हे दिसलं की आईवडिलांनी सुद्धा आता सावध राहायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी मुलांनी परदेशातून भारतात यायला हवं असं नाही. आई-वडिलांनी या गोष्टीसाठी स्वत:ला तयार करायला पाहिजे".
सुकन्या पुढे म्हणाल्या,"वृद्धाश्रम म्हणजे यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून यांना इथे आणून टाकलंय, असा समज आहे. पण खरंतर आपल्याकडे उत्तम वृद्धाश्रम झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:चं ठरवावं की, आपल्याला वृद्धाश्रमात जायचं आहे आणि मुलांना सांगावं की तू आमची काळजी करू नको. आम्ही तिथे आनंदात राहू. मुलांना परदेशात अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. घरातील काम करण्यासोबत ऑफिसमधली कामेदेखील करावी लागतात. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:ला तयार करायला हवं. मुलांना तुमच्याबद्दल प्रेम नाही का? असं नसतं. मुलांना मानसिक शांतता द्यायची असेल तर आई-वडिलांनी आपल्याला तयार करायला हवं. मुलांवर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहता काम नये. घरबसल्या अनेक गोष्टी आपण करू शकतो. बिल भरायचं असेल तर त्यासाठी मुलांनी परदेशातून भारतात येण्याची गरज नाही".
संबंधित बातम्या