Sudhir Mungantiwar On Marathi Theatre : मालिका, सिनेमे, वेबसीरिज, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत असलं तरी मराठी नाट्यवेड्या रसिकांसाठी मराठी नाटक आजही जिव्हाळ्याचा विषय आहे. आज मराठी रंगभूमी दिनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नाट्यकर्मींना एक आनंदाची बातमी दिली आहे. 


सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट केलं आहे,"महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह उत्तम व्हावी, यामधील सुविधा परिपूर्ण व्हाव्यात यासाठी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योजना करण्याचा निर्णय आज सह्याद्री अतिथीगृह येथील आयोजित बैठकीत घेतला". सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेने नाट्यसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 






गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार नाट्यगृहांबद्दल उघडपणे भाष्य करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृहांची परिस्थिती फारशी चांगली नाही. प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यासह अनेक नाट्यसृष्टीतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहातील अडचणींबद्दल आपलं मत व्यक्त करत असतात. 


नाट्यगृह सुधारण्यावर प्रशांत दामलेंचे सूचक वक्तव्य


नाट्यगृहांबाबत प्रशांत दामले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नसली तरी सूचक वक्तव्य केलं आहे. कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे दोन्ही नाट्यगृह तितकी वाईट नाही, पण तितकी छानही नाहीत, असं वक्तव्य प्रशांत दामले यांनी केलं आहे.


कोरोनाचा फटका नाट्यसृष्टीलादेखील बसला होता. पण आता नाट्यसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या नाटकांचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. तरुणांना नाटकाकडे वळवण्याचं काम आजच्या काळातील नवी नाटकं करत आहेत. तर काही जुनी नाटकं नव्या संचात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!


वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या  ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. . ‘चर्चा तर होणारच,’ ‘करायचं प्रेम तर मनापासून,’ ‘मास्टर माईंड,’ ‘संभ्रम’ यांसारख्या नवीन नाटकांसोबतच ‘ती परी अस्मानीची’ हे बालनाट्यही लवकरच येणार आहे.  ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Rangbhumi Din 2022 : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' ते 'चारचौघी'; मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी