Subodh Bhave : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. आता यासंदर्भात अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.
सुबोध भावेने लिहिले आहे, जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही. जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतो आहे. आणि हे संग्रहालय मराठी नाटकाचं असणार आहे. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे.
सुबोध भावेने पुढे लिहिले आहे,"मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं 'मराठी नाट्य विश्व' हे संग्रहालय असणार आहे. जगभरातील रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही कल्पना आहे. त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभं राहत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं आहे".
अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितली हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण
अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण सांगितली. हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते. म्हणून प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग प्रभावळकर यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले "अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?". अशी आठवण सांगून थ्रीडी, फोरडी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
संंबंधित बातम्या